ENG vs PAK Head To Head: इंग्लंड आणि पाकिस्तान अंतिम लढतीसाठी सज्ज, जाणून घ्या कोणाचे आहे वर्चस्व
या विश्वचषकात दोन्ही संघांना उपांत्य फेरीपर्यंत खेळणे कठीण वाटत होते. पण आज दोन्ही संघ अंतिम फेरीत आहेत.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) रविवारी टी-20 विश्वचषकाच्या (T20 WC 2022) अंतिम फेरीत पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात सामना होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. विश्वकपमधील दोन्ही संघांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. या विश्वचषकात दोन्ही संघांना उपांत्य फेरीपर्यंत खेळणे कठीण वाटत होते. पण आज दोन्ही संघ अंतिम फेरीत आहेत. जर कोणताही संघ अंतिम सामना जिंकला तर ते दोन टी-20 विश्वचषक जिंकण्याच्या वेस्ट इंडिजच्या (West Indies) विक्रमाची बरोबरी करेल. 2009 मध्ये पाकिस्तानने तर 2010 मध्ये इंग्लंडने टी-20 विश्वचषक जिंकला होता. दरम्यान, इंग्लंड आणि पाकिस्तान दोन्ही संघ अंतिम लढतीसाठी सज्ज आहे. तसेच जाणून घेवुया दोघांमध्ये कोणाचे वर्चस्व आहे.
इंग्लंडचा संघ पाकिस्तानपेक्षा सरस
अंतिम सामन्यापूर्वी, दोन्ही संघांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची आकडेवारी पाहिली, तर इंग्लंडचा संघ पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी इंग्लंडने 18 सामने जिंकले असून पाकिस्तानने 9 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. T20 विश्वचषकात इंग्लंड वरचढ आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 2 टी-20 विश्वचषक सामने खेळले गेले आहेत. इंग्लंड संघाने दोन्ही जिंकले आहेत. आकडेवारीनुसार इंग्लंडचा संघ पाकिस्तानपेक्षा सरस आहे. पण पाकिस्तानचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांना हलके घेण्याची चूक इंग्लंड करणार नाही. (हे देखील वाचा: PAK vs ENG यांच्यातील अंतिम सामन्यासाठी ICC ने नियमांमध्ये केले काही खास बदल, असा खेळला जावू शकतो सामना)
1992 विश्वचषकाप्रमाणे 2022 विश्वचषक
या स्पर्धेतील पाकिस्तान संघाचा प्रवास पाहिला तर 1992 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या आठवणी ताज्या होतात. त्या विश्वचषकातही पाकिस्तानचा संघ मोठ्या अडचणींनंतर अंतिम फेरीत पोहोचला आणि चॅम्पियन ठरला. 1992 मध्ये, मेलबर्नमध्येच फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करून पाकिस्तानने पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. पाकिस्तानला इतिहासाची पुनरावृत्ती करून 1992 मध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.