ENG vs NZ 1st Test: न्यूझीलंडच्या या नवख्या फलंदाजाने मोडला Sourav Ganguly चा 25 वर्ष जुना रेकॉर्ड, Lord's येथे डेब्यू सामन्यात केल्या इतक्या धावा

पहिला सामना खेळण्यासाठी आलेल्या किवी संघाचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने शानदार शतक झळकावले. या दरम्यान त्याने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा 25 वर्ष जुना विक्रमही मोडला.

डेव्हन कॉनवे (Photo Credit: PTI)

ENG vs NZ 1st Test: न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) यांच्यात ऐतिहासिक लॉर्ड्स (Lord's) मैदानावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने दिवसाखेर 3 विकेट्स गमावून 246 धावा केल्या. पहिला सामना खेळण्यासाठी आलेल्या किवी संघाचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने (Devon Conway) शानदार शतक झळकावले. या दरम्यान त्याने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) 25 वर्ष जुना विक्रमही मोडला. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उल्लेखनीय म्हणजे लॉर्ड्स कसोटीच्या (Lord's Test) पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या डावातील 83व्या ओव्हरमध्ये कोनवेने 131 रन्सची धावसंख्या पार करताच गांगुलीचा विक्रम मोडीत काढला. (ENG vs NZ 1st Test 2021: न्यूझीलंड विरोधात मैदानात James Anderson ने रचला इतिहास, माजी इंग्लंड कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकच्या या विक्रमाची केली बरोबरी)

25 वर्षांपूर्वी गांगुलीने 301 चेंडूंत 20 चौकारांसह 131 धावा केल्या होत्या. लॉर्ड्स येथे कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या हॅरी ग्रॅहम आणि जॉन हॅम्पशायर यांच्यानंतर तो तिसरा खेळाडू ठरला होता. विशेष म्हणजे कॉनवे आणि गांगुली यांचा वाढदिवस 8 जुलै रोजी आहे. कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर दोघेही स्वस्त माघारी परतले तर 29-वर्षीय कॉनवेने 163 चेंडूत शतक झळकावले. दुसरीकडे, इंग्लंडचा पदार्पणवीर रॉबिनसनने पहिल्या सत्रात 23 धावांवर टॉम लॅथमला बाद केले. त्यानंतर अनुभवी जेम्स अँडरसनने 13 धावांवर कर्णधार विल्यमसनचा त्रिफळा उडवला. रॉस टेलरही अवघ्या 14 धावा करून माघारी परतला. त्यानंतर कॉनवे आणि हेन्री निकोल्सने सूत्रे हाती घेतली आणि दिवसाखेर संघाला आणखी विकेट गमावू दिली नाही. कॉनवेने सामन्याच्या पहिल्या दिवशी 131 धावांचा टप्पा पार करताच लॉर्ड्स येथे पदार्पण सामन्याला अविस्मरणीय केले. या मैदानावर कसोटी सामन्यात पदार्पणात इंग्लिश फलंदाज मॅट प्रायरने नाबाद 126 धावा फटकावल्या ही सौरव गांगुलीनंतरची दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी 161 वा कसोटी सामना खेळणाऱ्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसनने माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकच्या सर्वाधिक कसोटी सामन्यांच्या विक्रमाची बरोबरी केली.