डॉ विजय पाटील यांची Mumbai Cricket Association च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड, अमोल काळे उपाध्यक्ष

पाटील हे डी.वाय.पाटील क्रीडा अकादमीचे प्रमुख आहेत. सचिव पदावर संजय नाईक तर उपाध्यक्ष पदावर अमोल काळे यांची निवड करण्यात आली आहे.

(Photo Credit: Wikipedia)

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत डॉ विजय पाटील (Dr Vijay Patil) यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पाटील हे डी.वाय.पाटील क्रीडा अकादमीचे प्रमुख आहेत आणि या पदासाठी त्यांनी एकमेव अर्ज भरला असल्या कारणाने त्याची बिनविरोध निवड होणे अपेक्षित होते. आणि आज झालेल्या निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब झाला. दरम्यान, सचिव पदावर संजय नाईक (Sanjay Naik) तर उपाध्यक्ष पदावर अमोल काळे (Amol Kale) यांची निवड करण्यात आली आहे.

पाटील यांनी क्रिकेट फर्स्ट गटाकडून अर्ज दाखल केला होता. यानंतर बाळ महाडदळकर गटाने पाटील यांना अध्यक्षपदासाठी पाठींबा दिला.याआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विजय पाटील यांना शरद पवारांच्या हस्ते पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या निवडणुकीत महादळकर गटाचे वर्चस्व राहिले. त्यांनी एकूण १४ जागांपैकी १० जागांवर विजय मिळवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार माजी क्रिकेटपटू संदीप पाटील देखील यंदाच्या निवडणुकीत भाग घेणार होते, पण हितसंबंधांचा मुद्दा लक्षात घेत पाटील यांनी माघार घेतली. एमसीएच्या व्यवस्थापकीय समितीत जागेसाठी पाटील यांनी 1996 आणि 1998 मध्ये एमसीएची निवडणूक लढविली होती. समूहाच्या मोहिमेचा भाग न बनता पाटील यांनी दोन्ही प्रसंगी विजय मिळवला.