Mumbai क्रिकेट टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी Amol Muzumdar, माजी फिरकीपटू साईराज बहुतुले आणि माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी होते शर्यतीत
मुजुमदार यांनी यापूर्वी मुंबई संघासोबत आठ वेळा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. मुजुमदार व्यतिरिक्त माजी भारतीय फिरकीपटू साईराज बहुतुले आणि मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता.
रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) विजेते अमोल मुजुमदार (Amol Muzumdar) यांची 2021-22 देशांतर्गत हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाच्या (Mumbai Cricket Team) मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. मुजुमदार यांनी यापूर्वी मुंबई संघासोबत आठ वेळा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. मुजुमदार व्यतिरिक्त माजी भारतीय फिरकीपटू साईराज बहुतुले आणि मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. क्रिकेट सुधार समितीच्या जतीन परांजपे, निलेश कुलकर्णी व विनोद कांबळी या तीन सदस्यांनी ही निवड केली. 2008-09 च्या विजयानंतर मुंबई सोडल्यानंतर मजुमदार यांनी उत्तरार्धात आसाम आणि आंध्रचे प्रतिनिधित्व केले. शिवाय त्यांनी 2006-07 मध्ये कर्णधार म्हणून रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. गेल्या हंगामात हजारे ट्रॉफी जिंकूनही रणजी करंडक स्पर्धेत मुंबईला गेल्या पाच हंगामात विजय मिळवता आलेला नाही. मुजुमदार यांनी 2014 क्रिकेटमधून खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केली त्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून प्रभावी कामगिरी बजावली.
मुजुमदार यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सच्या फलंदाज प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. 2019 मध्ये भारत दौर्यावर असताना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून देखील त्याच्याकडे लहान कामगिरी पार पडली होती. विशेष म्हणजे मुजुमदार यांना चार महिन्यापूर्वी त्यांचे मुंबईचे सहखेळाडू रमेश पोवार यांच्याविरुद्ध प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत पराभव पत्करावा लागला होता. पण काही दिवसांपूर्वी पोवार यांची राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली त्यानंतर मुंबई संघाचे प्रशिकपद पुन्हा रिक्त झाले. अशा स्थितीत मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) गेल्या आठवड्यात मुंबई वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते.
मुजुमदार यांच्या खेळाडू म्हणून कामगिरीबद्दल बोलायचे तर त्यांनी 1993 ते 2013 या स्थानिक क्रिकेट हंगामात जबरदस्त कामगिरीचे दर्शन घडवले होते. त्यांनी 171 प्रथम श्रेणी सामन्यात तब्बल 11,167 धावा कुटल्या. अमोल मुजुमदारने मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. 1993-94 मध्ये पदार्पण सामन्यात मुजूमदारने विक्रमी 260 धावांची मोठी खेळी खेळली होती. डेब्यू सामन्यात 260 धावांचा डाव त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा डाव होता. याशिवाय त्यांनी 30 शतके आणि 60 अर्धशतके ठोकली पण त्यांना कधीही भारतीय संघात संधी मिळाली नाही.