DC vs CSK, IPL 2020: फाफ डु प्लेसिसचे अर्धशतक, रायुडू, जडेजाची फटकेबाजी; सीएसकेचे DC समोर 180 धावांचे लक्ष्य

दिल्लीसमोर आता विजयासाठी 180 धावांच लक्ष्य आहे. सीएसकेसाठी फाफ डु प्लेसिसने अर्धशतक ठोकलं आणि 58 धावा केल्या. रायुडूने नाबाद 45 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 32 धावांचे योगदान दिले.

फाफ डु प्लेसिस (Photo Credit: Twitter/IPL)

DC vs CSK, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आजच्या डबल-हेडरच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) टॉस जिंकला आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शारजाह क्रिकेट स्टेडियमवर 4 विकेट गमावून 179 धावा केल्या. दिल्लीसमोर आता विजयासाठी 180 धावांच लक्ष्य आहे. सीएसकेसाठी (CSK) फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessi) अर्धशतक ठोकलं आणि 58 धावा केल्या. शेन वॉटसनने 36 आणि अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) 25 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 45 आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 12 चेंडूत 4 षटकारासह नाबाद 32 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्ससाठी एनरिच नॉर्टजेने सर्वाधिक 2 तर तुषार देशपांडे आणि कगिसो रबाडाला प्रत्येकी 1 यश मिळाले. आजच्या सामन्यात विजय मिळवून दिल्ली प्ले-ऑफच्या दिशेने आणखीन एक पाऊल उचललं तर सुपर किंग्स आपले आव्हान कायम ठेवू पाहत असेल. दिल्ली कॅपिटल्स गुणातालिकेत दुसऱ्या, तर सीएसके सहाव्या स्थानावर आहे. (DC vs CSK, IPL 2020: एमएस धोनीने जिंकला टॉस, शारजाह येथे CSKचा पहिले फलंदाजीचा निर्णय; केदार जाधवचा सुपर किंग्स संघात समावेश)

आजच्या सामन्यात सीएसकेसाठी सॅम कुरन आणि डु प्लेसिसची जोडी सलामीला आली. कुरन भोपळाही न फोडता देशपांडेच्या चेंडूवर नॉर्टजेकडे झेलबाद झाला. कुरनननंतर फलंदाजीसाठी आलेल्या वॉटसनने डु प्लेसिससह डाव पुढे नेला आणि अर्धशतकी भागीदारी रचली. वॉटसन 36 धावा करून नॉर्टजेच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला आणि सीएसकेला 87 धावांच्या एकूण धावसंख्येवर दुसरा धक्का बसला. या दरम्यान डु प्लेसिसने अर्धशतक ठोकले, पण 58 धावा करून तो रबाडाचा शिकार बनला. सीएसके कर्णधार एमएस धोनी आजच्या सामन्यात देखील अपयशी ठरला आणि नॉर्टजेने फक्त 3 धावांवर त्याला माघारी धाडले. त्यानंतर रायुडूने जडेजासह चांगली भागीदारी करत सीएसकेला धावांपर्यंत मजल मारून दिली.

दुसरीकडे, आजच्या सामन्यासाठी सीएसकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. पियुष चावलाच्या जागी सीएसकेने केदार जाधवला आजच्या सामन्यासाठी संधी दिली. दुसरीकडे, डीसी टीम आज कोणत्याही बदलाशिवाय मैदानावर उतरली आहे. कर्णधार श्रेयस अय्यर यांनीही रिषभ पंत ठीक असून त्याला आणखीन एका सामन्यासाठी विश्रांती देण्यात आल्याचं सांगितलं.