Ind vs Ban: कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने घेतली खास चाहत्याची भेट (Video)

या भेटीमुळे दोघांनाही प्रचंड आनंद झाला.

विराट कोहलीने घेतली खास चाहत्याची भेट (Photo Credit : Twitter.)

शनिवारी बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका (India vs Bangladesh Test Series) जिंकल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या एका खास चाहत्याची भेट घेतली. या भेटीमुळे दोघांनाही प्रचंड आनंद झाला. विराट आपल्या खास फॅनला फक्त भेटलाच नाही, तर त्याच्याशी बोलला, फोटो काढले आणि ऑटोग्राफही दिला. इंदूरच्या सुखलिया येथे राहणारी पूजा शर्मा असे या विराटच्या चाहत्याचे नाव आहे. पूजाने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. पूजा अपंग असल्याने सध्या ती घरीच असते. ती विराटची खूप मोठी फॅन आहे. पुजाची शनिवारी विराटशी भेट झाल्यानंतर तिची प्रदीर्घ काळापासूनची इच्छा पूर्ण झाली.

यावेळी पूजा म्हणाली, ‘मी विराटची खूप मोठी फॅन आहे. विराटचा प्रत्येक सामना मी पाहिला आहे. यावेळी मी प्रथमच स्टेडियमवर येऊन हा सामना पाहिला, ज्याचा आनंद काही वेगळाच आहे. सुखलिया येथे राहणारी पूजा ललित शर्मा, वय-24 अशा एका आजाराशी लढत आहे, ज्यामध्ये तिची हाडे आपोआप मोडली जातात. एक किंवा दोन दिवसात तुटलेली हाडे जोडलीदेखील जातात. पूजाने बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर संगणक कोर्स केला. परंतु अपंगत्वामुळे सध्या ती घरीच आहे. पूजाला दोन भाऊ आहेत. विराटला भेटल्यानंतर पूजा प्रकाशझोतात आली. सध्या तिची आणि विराटची भेट चर्चेचा विषय बनला आहे. (हेही वाचा: भारतीय वेगवान गोलंदाजांची प्रभावी खेळी, बांग्लादेशविरुद्ध एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवत घेतली 1-0 अशी आघाडी)

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने, ब्रेकनंतर कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध इंदूरच्या होळकर स्टेडियमवर कसोटी सामना जिंकलाही. या कसोटीत भारताने 130 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला. या सामन्यात मोठा विजय मिळाल्यानंतर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पुजाला भेटला.