2008 सिडनी टेस्ट: हरभजन सिंह-अँड्र्यू सायमंड्स मध्ये झाले होते 'मंकीगेट' प्रकरण; कुंबळेच्या नेतृत्वात टीम इंडिया दौरा करणार होती रद्द, पर्थमध्ये कांगारूंचे केले हाल
12 वर्षांपूर्वी2008 मध्ये झालेल्या सिडनी कसोटी सामन्यात बराच वाद झाला होता. हा तोच सामना आहे ज्यात 'मंकीगेट' प्रकरण घडले होते. हरभजन सिंहने त्यांला वानर म्हणून संबोधून वांशिक टिप्पणी केल्याचा सायमंड्सने आरोप केला होता.
टीम इंडियाचा 2008 ऑस्ट्रेलिया (Australia) दौरा कदाचितच कोणी विसरू शकला असेल. 12 वर्षांपूर्वी2008 मध्ये झालेल्या सिडनी कसोटी (Sydney Test) सामन्यात बराच वाद झाला होता. हा तोच सामना आहे ज्यात 'मंकीगेट' (Monkeygate) प्रकरण घडले होते. अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्या नेतृत्वात भारतीय संघ (Indian Team) मालिकेत 1-0 ने पिछाडीवर होता आणि दुसरा कसोटी सामना 2 जानेवारीपासून सिडनी येथे खेळला जाणार होता. हरभजन सिंहने (Harbhajan Singh) त्याला वानर म्हणून संबोधून वांशिक टिप्पणी केल्याचा अँड्र्यू सायमंड्सने (Andrew Symonds) आरोप केला होता. मॅच रेफरीने भज्जीवर तीन कसोटी सामन्यांसाठी बंदी घातली. अनिल कुंबळेच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत दौरा रद्द करण्याची धमकी दिली. भारतातही निषेध सुरू झाला आणि खराब अंपायरिंगबद्दल बरेच प्रश्न उपस्थित झाले. नंतर आयसीसीने प्रकरणाची दखल घेतली आणि भज्जीवरील बंदी हटवण्यात आली. ही घटना क्रिकेट इतिहासाच्या मोठ्या वादात मोजली जाते. (क्रिकेट विश्वातील खुन्नस; खेळाडूवृत्तीने घेतला 'बदला'; पाहा 'या' 5 अविस्मरणीय घटना)
या सामन्यात खेळाडूवृत्तीने फक्त एकच संघ खेळला असल्याचे कुंबळे यावेळी म्हणाले. त्याचे हावभाव स्पष्टपणे समजण्या सारखे होते. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ यांनीही सामन्याबद्दल सांगितले की सामना कदाचित त्याच्या चुकीच्या निर्णयांसाठीच ओळखला जाईल. हे प्रकरण आणि मैदानावरील विवाद बाजूला ठेवून दोन्ही संघ पर्थमध्ये तिसऱ्या सामन्यात आमने-सामने आले. या सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन केले आणि तिसरा टेस्ट सामना 72 धावांनी जिंकला. पर्थ कसोटी भारताच्या विजयासाठी आणि कुंबळेच्या 600 व्या कसोटी विकेटसाठीही लक्षात ठेवली जाते.
दरम्यान, दुसरा सामना खराब अंपायरिंगसाठीही ओळखला जातो. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॅटिंगचा निर्णय घेतला. पण, टीमची सुरुवात चांगली राहिली नाही आणि 135 धावांवर त्यांनी 6 विकेट गमावल्या. अँड्र्यू सायमंड्स 3 वेळा आऊट होते पण अंपायरने भारताच्या विरुद्ध निर्णय देत सायमंड्सला नॉटआऊट दिले. सायमंड्सने याचा पूर्ण फायदा घेतला आणि 162 धावांचा डाव खेळत ऑस्ट्रेलियाला 463 धावांवर पोहचवले. भारतीय संघाने पहिल्या डावात 532 धावा केल्या आणि 69 धावांची आघाडी घेतली. व्हीव्हीस लक्ष्मणने 109 आणि सचिन तेंडुलकरने नाबाद 154 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने 7 विकेटवर 401 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज खराब अंपायरिंगचे शिकार बनले. राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांना चुकीच्या निर्णयामुळे माघारी परतावे लागले.