CPL 2020: ट्रिनबागो नाइट रायडर्स पूर्ण केला 'परफेक्ट 10', सीपीएलच्या सेमीफायनल लाइन-अपची पुष्टी; 11 सप्टेंबर रोजी होणार अंतिम लढत

रविवारी, नाइट रायडर्सने सीपीएल 2020 मध्ये आजवरचे सर्व सामने जिंकून 'परफेक्ट 10' पूर्ण केले. नाइट रायडर्ससह सेमीफायनलमध्ये गयाना अमेझॉन वॉरियर्स, सेंट लुसिया झुक्स आणि जमैका थलावाज यांनी स्थान मिळवले.

ट्रिनबागो नाइट रायडर्स, सीपीएल  2020 (Photo Credit: Twitter/CPL)

कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (Caribbean Premier League) 2020 ट्रिनबागो नाइट रायडर्सची विजयी घुडदौड कायम आहे. ज्या दिवशी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) वेळापत्रकाची घोषणा झाली त्या दिवशी सीपीएलने देखील यंदाच्या मोसमातील सेमीफायनल लाइन-अपची पुष्टी केली. रविवारी, ट्रिनबागो नाइट रायडर्सने सीपीएल (CPL) 2020 मध्ये आजवरचे सर्व सामने जिंकून 'परफेक्ट 10' पूर्ण केले. कीरोन पोलार्डच्या नाइट रायडर्ससह सेमीफायनलमध्ये गयाना अमेझॉन वॉरियर्स, सेंट लुसिया झुक्स आणि जमैका थलावाज यांनी स्थान मिळवले. ग्रुप स्टेजमधील अखेरच्या सामन्यात नाइट रायडर्सने सेंट किट्स आणि नेव्हिस पैट्रियट्सचा 9 विकेटने धुव्वा उडवला. पाकिस्तानी वंशाच्या ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर फवाद अहमदने 4 विकेट घेत स्टार कामगिरी बजावली व 77 धावांवर सेंट किट्स आणि नेव्हिस पैट्रियट्स संघ ऑल-आऊट झाला. या सीपीएल हंगामात ट्रिनबागोचा हा सलग दहावा विजय आहे आणि लीगच्या टप्प्यात ते अजेय राहिले. (CPL 2020: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन डंकने पावसामुळे मैदानात जमलेल्या पाण्यात लगावली धाव, पाहून गोंधळलेल्या यूजर्सने दिल्या अशा प्रतिक्रिया Watch Video)

सेंट किट्स आणि नेव्हिस पैट्रियट्सचा 77 धावा, सीपीएलच्या इतिहासातील पाचवा सर्वात कमी स्कोअर आहे. प्रत्युत्तरात ट्रिनबागोने 12 व्या ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून लक्ष्य गाठले. आता ट्रिनबागोचा पहिल्या सेमीफायनल सामन्यात, मंगळवारी याच ठिकाणी त्यांचा सामना थलावाजशी होईल. लीग स्टेजमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या नाइट रायडर्सने अखेर 2018 मध्ये विजेतेपद जिंकले होते आणि यंदा चौथ्या विजेतेपदाच्या शोधात आहेत. नाइट रायडर्सने 10 सामने जिंकून 20 गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले. नाईट रायडर्सनंतर अमेझॉन वॉरियर्स येतात ज्यांनी 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यांत संघाला पराभव पत्करावा लागला आहे.

सेंट लुसिया ज्यूक्सनेही 10 पैकी 6 विजय जिंकून सेमीफायनल गाठले. याव्यतिरिक्त, या यादीत चौथा संघ जमैका थलावाज आहे ज्यांनी 10 पैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत, तर त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. पहिला सेमीफायनल ट्रिनबागो नाइट रायडर्स आणि जमैका थलावाजमध्ये 8 सप्टेंबर, तर दुसरा गयाना अमेझॉन वॉरियर्स आणि सेंट लुसिया झुक्समध्ये 9 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. सीपीएलचा महामुकाबला 11 सप्टेंबर रोजी त्रिनिदाद येथे ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळला जाईल.