IPL 2021: आयपीएलमधील ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर मोठी अडचण; ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून येणाऱ्या नागरिकांवर घातली बंदी, नियम तोडल्यास 5 वर्षांचा तुरुंगवास

दररोज लाखो लोक कोरोनाच्या तडाख्यात सापडत असून अनेक कुटुंब उघड्यावर आली आहे. भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक देश घाबरुन गेले आहेत.

प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. दररोज लाखो लोक कोरोनाच्या तडाख्यात सापडत असून अनेक कुटुंब उघड्यावर आली आहे. भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक देश घाबरुन गेले आहेत. याचपाश्वभूमीवर भारतातील वाढत्या करोना रुग्णसंख्येचा ऑस्ट्रेलियाने (Australia) घेतला धसका आहे. दरम्यान, भारतातून परतणाऱ्या नागरिकांना देशात परतण्यास ऑस्ट्रेलिया सरकारने बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लघंन केल्यास नागरिकांना दंड आणि थेट 5 वर्षाच्या तरूंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे. यामुळे आयपीएल (IPL 2021) स्पर्धेत सामील झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकटपटूंसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

भारतात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून आपल्या देशात होणाऱ्या हवाई वाहतुकीवर 15 मे पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रशासनाने आणखी कडक पाऊल उचलले आहेत. जे ऑस्ट्रेलियन नागरिक गेल्या 14 दिवसांपासून भारतात आहेत, त्यांना देशात परतण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना दंड आणि तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 15 मे नंतर प्रशासनाकडून या निर्णयाचा फेरविचार केला जाणार आहे. हे देखील वाचा- 'लोकांना मदत करण्याची माझी वेळ'! Mission Oxygen साठी ‘गब्बर’ Shikhar Dhawan कडून 20 लाखांसह IPL मधील बक्षीस रक्कम दान देण्याची घोषणा

भारतात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. देशात गेल्या 24 तासात 4 लाख 1 हजार 993 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच तब्बल 3 हजार 523 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसरी लाटेने त्सुनामीसारखाच रौद्रावतार घेतले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानसह देशातील विविध राज्यात नागरिकांचे मदतीसाठीचे टाहो कानावर येऊ लागले आहेत. चिंतानजक बाब म्हणजे, याआधी रुग्णालयांबाहेर रांगा दिसत होत्या. मात्र, आता स्मशानभूमी, कब्रस्थाने यांच्याबाहेर मृतदेहांच्या रांगा लागल्याच्या दृश्यांनी देशातील परिस्थिती कोलमडत असल्याचे दिसून आले आहे.