WTC Points Table: दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव, WTC टेबलमध्ये मोठा फेरबदल; टीम इंडियाचा मार्ग सोपा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पुन्हा एकदा खेळण्याच्या आशा वाढल्या आहेत.

Team India (Photo Credit - Twitter)

WTC Points Table: मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दणदणीत पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) गाठण्याच्या शर्यतीत आणखी मागे पडला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पुन्हा एकदा खेळण्याच्या आशा वाढल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामनाही ऑस्ट्रेलियाने 182 धावांनी जिंकला आहे. यासह ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेकडे अजून तीन कसोटी सामने खेळायचे आहेत ज्यात दोन घरच्या सामन्यांचा समावेश आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमधील फक्त दोनच संघ अंतिम सामना खेळतील. या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल-2 स्थानांवर होते. दोघांनाही फायनल खेळण्याची संधी होती. पण दक्षिण आफ्रिकेला दोन्ही कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या घसरगुंडीमुळे टीम इंडियाने पॉइंट टेबलमध्ये आपले दुसरे स्थान मजबूत केले आहे. (हे देखील वाचा: ICC Women’s T20 World Cup 2023: महिला T20 विश्वचषक 2023 आणि दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर)

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये खूप मागे होती, पण बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही कसोटीतील विजय, इंग्लंडचा पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका विजय आणि दक्षिण आफ्रिकेवर ऑस्ट्रेलियाचा विजय यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरीची शर्यत पूर्णपणे बदलली आहे.

संघाची रैंक विजय पराभव ड्रॉ पांईंट
1. ऑस्ट्रेलिया 10 1 3 78.57
2. भारत 8 4 2 58.93
3. श्रीलंका 5 4 1 53.33
4. दक्षिण अफ्रिका 6 6 0 50
5. इंग्लंड 10 8 4 46.97
6. वेस्टइंडीज 4 5 2 40.91
7. पाकिस्तान 4 6 2 38.89
8. न्यूझीलंड 2 6 1 25.93
9. बांगलादेश 1 10 1 11.11

या मालिकेद्वारे अंतिम फेरीचा मार्ग होईल निश्चित 

टीम इंडिया अजून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. सध्या टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे टीम इंडियाचा मार्ग सुकर होत आहे. सरतेशेवटी, या तीन मालिकांच्या निकालांवर आधारित, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2022-23 च्या अंतिम फेरीतील संघांचा निर्णय घेतला जाईल.