ऑस्ट्रेलियन अष्टपैलू Glenn Maxwell ने निवडले जगातील टॉप- 5 सर्वोत्तम T20 खेळाडू, एकाही भारतीय खेळाडूला यादीत नाही मिळाले स्थान
आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक (Men's T20 World Cup) 2021 स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) टी-20 च्या आपल्या आवडत्या टॉप-5 खेळाडूंची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याला टी-20 वर्ल्ड इलेव्हनमध्ये फिट होणाऱ्या पाच खेळाडूंची निवड करण्यास सांगितले होते. मॅक्सवेलने 5 खेळाडू निवडले जे क्रिकेटच्या मैदानातील सर्व विभागात सर्वोत्तम आहेत हे खेळाडू जगातील कोणत्याही फाईव्ह-ए-साइडला कडवी झुंज देऊ शकतात. विशेष म्हणजे मॅक्सवेलने निवडलेल्या पाच खेळाडूंमध्ये दोन अष्टपैलू, एक फिरकीपटू, एक यष्टीरक्षक फलंदाज आणि एका वेगवान गोलंदाजाचा समावेश आहे. इतकंच नाही तर त्याने कोणत्याही भारतीय खेळाडूला निवडले नाही.
मॅक्सवेलने अफगाणिस्तानचा महान लेग स्पिनर राशिद खानला (Rashid Khan) पहिला खेळाडू म्हणून निवडले. खानने आतापर्यंत 281 टी-20 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 388 विकेट्स घेतल्या आहेत. 23 वर्षीय खानने खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये आपल्या कारकिर्दीत आधीच अनेक पराक्रम गाजवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर राशिदने 51 सामन्यांत 12.63 च्या सरासरीने 95 विकेट्स घेतल्या आहेत. मॅक्सवेलला वाटले की तो आयसीसी टी-20 विश्वचषक दरम्यान फलंदाजांसाठी मोठा धोका ठरू शकतो, कारण युएईची खेळपट्टी विशेषत: स्पिन गोलंदाजीसाठी अनुकूल अशी अपेक्षित आहे. दुसरा खेळाडू म्हणून मॅक्सवेलने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची (Andre Russell) निवड केली आहे. रसेलने टी-20 मध्ये 6405 धावा आहेत आणि 340 विकेट्स घेतल्या आहेत. तिसरा खेळाडू म्हणून मॅक्सवेलने इंग्लंड अष्टपैलू बेन स्टोक्सचा समावेश केला आहे. स्टोक्सने आतापर्यंत 148 टी-20 सामन्यांमध्ये 2865 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 86 विकेट्सही घेतल्या आहेत. मॅक्सवेलने म्हटले की टी -20 वर्ल्ड कप दरम्यान इंग्लंडला त्याची कमतरता नक्कीच जाणवेल.
त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टची चौथा खेळाडू म्हणून निवड केली आहे. मॅक्सवेल म्हणाला की तो “प्रत्येक कल्पनाशक्तीमध्ये गेम-चेंजर” आहे. अखेरीस ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटची अंतिम खेळाडूं म्हणून निवड केली आहे. त्याच्या वेग आणि अचूक यॉर्करमुळे मॅक्सवेलने त्याला पहिल्या 5 टी-20 खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे. दुखापतींनी ग्रस्त असूनही, टेट नियमितपणे 150 किमी/तासाने गोलंदाजी करत आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 171 टी-20 सामने खेळले असून त्याने प्रत्येकी 22.41 च्या सरासरीने 218 विकेट घेतल्या आहेत.