AUS-W vs IND-W: अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन पंचांचा वादग्रस्त निर्णय, झुलन गोस्वामीच्या नो बॉलमुळे टीम इंडियाने हाती आलेला सामना गमावला (Watch Video)

झूलन गोस्वामीच्या वादग्रस्त नो-बॉलमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध हातातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. अनेक भारतीय चाहत्यांनी थर्ड-अंपायरवर भारताच्या पराभवाचे खापर फोडले.

निकोला कॅरीला झुलन गोस्वामीचा नो-बॉल (Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलिया महिला संघाने (Australia Women's Team) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील शेवटच्या चेंडूवर भारतीय महिलांचा (India Women) 5 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. पहिले फलंदाजी करत भारताने 7 बाद 274 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 5 विकेट गमावून 275 धावा करून सामना जिंकला. बेथ मुनीचे झुंजार शतक आणि भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) नो-बॉलमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध हातातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. बेथ मुनीने (Beth Monney) ऑस्ट्रेलियासाठी 133 चेंडूत 125 धावांची मॅच विजयी इनिंग खेळली. सामन्यातील वळण शेवटच्या षटकात आले जेव्हा कांगारू विजयापासून फक्त 13 धावा दूर होते आणि कर्णधार मिताली राजने चेंडू तिची अनुभवी वेगवान गोलंदाज गोस्वामीला दिला. (AUS-W vs IND-W 2nd ODI: ऑस्ट्रेलियाने भारताच्या तोंडून खेचून काढला विजयाचा घास, बेथ मूनी-McGrath बनले गेमचेंजर; मालिकेत घेतली 2-0 अजिंक्य आघाडी)

ओव्हरचा पहिलाच चेंडू पूर्ण फुल्ल-टॉस होता, ज्यावर मुनीने शॉट लावून तीन धावा घेतल्या. पुढच्या चेंडूवर कॅरीने आणखी एक सुरेख फटका मारून दोन धावा काढल्या. तिसरा चेंडू नो बॉल होता म्हणजे ऑस्ट्रेलियाला अतिरिक्त चेंडू व फ्री हिट मिळाला. ऑस्ट्रेलियाने पुढच्या दोन चेंडूत चार धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला 50 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती पण केरी आणि मुनी एकच धाव घेऊ शकले आणि मितालीच्या टीम इंडियाने जल्लोष सुरु केली. तथापि, निकोलाचा शॉट शॉर्ट स्क्वेअर लेगवर पकडला गेला पण पंचांनी थर्ड अंपायरला विचारले आणि रिप्ले पाहून आढळून आले की चेंडू फलंदाजाच्या कंबरेच्या वर होता म्हणजेच तिला नो बॉल मिळाला. अशाप्रकारे डोंघी संघाची धावसंख्या बरोबरीत आली. अखेरीस कांगारू संघाने सहाव्या चेंडूवर दोन धावा केल्या आणि सामना तसेच मालिका खिशात घातली. भारतीय संघाला जिंकण्याच्या अनेक संधी मिळाल्या होत्या पण प्रत्येक वेळी ते संधी गमावताना दिसले. भारताचे क्षेत्ररक्षण असे होते की, विरोधी फलंदाज एका धावेचे दोनमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, झूलन गोस्वामीच्या या नो-बॉलमुले सोशल मीडियावर जोरदार वाद सुरु झाला आहे. अनेक भारतीय चाहत्यांनी थर्ड-अंपायरवर भारताच्या पराभवाचे खापर फोडले.

दुसरीकडे, एक वेळी फक्त 52 धावांवर चार विकेट गमावलेल्या कांगारू संघाला मूनी आणि ताहिला मॅकग्रा यांनी ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळ आणले, दोन्ही फलंदाजांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 126 धावांची शानदार भागीदारी केली. ताहिलाने 77 चेंडूत 74 धावांची खेळी खेळली. 39 व्या षटकात दीप्ती शर्माने मॅकग्राला बाद करत मुनीसोबतची भागीदारी तोडली. मूनीने मात्र ऑस्ट्रेलियाला खेळात कायम ठेवले व अखेरीस विजयीरेष ओलांडून दिली.