Ashoke Dinda Announces Retirement: वेगवान गोलंदाज अशोक डिंडाने केली क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्तीची घोषणा; भारताकडून 13 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले

मंगळवारी डिंडाने कोलकातामध्ये निवृत्तीची (Retirement) घोषणा केली. या 36 वर्षीय वेगवान गोलंदाजाने भारताकडून 13 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत

Ashoke Dinda (संग्रहित संपादित प्रतिमा)

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अशोक डिंडाने (Ashoke Dinda) क्रिकेट विश्वाला निरोप दिला आहे. मंगळवारी डिंडाने कोलकातामध्ये निवृत्तीची (Retirement) घोषणा केली. या 36 वर्षीय वेगवान गोलंदाजाने भारताकडून 13 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वात 2009 मध्ये डिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. डिंडाला प्रथम श्रीलंकेविरुद्ध नागपूर टी-20 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. यानंतर, त्याने 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले. डिंडाने भारताकडून 12 एकदिवसीय सामने आणि 17 टी-20 विकेट घेतले. मात्र, 2013 नंतर तो टीम इंडियामधून बाहेर पडला आणि त्यानंतर तो परतला नाही.

या गोलंदाजाने आपला शेवटचा सामना 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तसेच 2012 मध्ये अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला होता. डिंडाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 2013  मध्ये संपली पण शेवटच्या 7 वर्षात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली चमक दाखविली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डिंडाने 420 बळी घेतले. इतकेच नाही तर, लिस्ट ए आणि टी-20  मध्ये त्याच्याकडे 151-151 विकेट आहेत.

निवृत्तीची घोषणा करतांना डिंडा म्हणाला, 'प्रत्येकाचे लक्ष्य भारताकडून खेळणे हे आहे, मी बंगालकडून खेळलो, त्यामुळे मला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मला भारताकडून खेळण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो. दीप दास गुप्ता, रोहन गावस्कर या ज्येष्ठ खेळाडूंनी मला बंगालकडून खेळण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रत्येक वेळी जेव्हा मला विकेट मिळाली तेव्हा मला समर्थन मिळाले.’

अशोक डिंडा आयपीएलमधील 5 संघांचा भाग होता. तो दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाइट रायडर्स, पुणे वॉरियर्स, राइझिंग पुणे सुपर जायंट आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला. अशोक दिंडाने आयपीएलमध्ये 78 सामन्यांत 69 बळी घेतले. वेगवान गोलंदाज डिंडाची पहिली आयपीएल विकेट विराट कोहली होती. (हेही वाचा: आपल्या कारकीर्दीची दमदार सुरूवात करणारे 'हे' 5 क्रिकेटपटू आज कुठे आहेत? घ्या जाणून)

2019 मध्ये बंगालच्या गोलंदाजी प्रशिक्षकाशी डिंडाचा भांडण झाले होते. मैदानात सर्वांसमोर गोलंदाजी प्रशिक्षकाला शिव्या दिल्याचा आरोप डिंडावर होता. यानंतर डिंडा बंगाल संघ सोडून गोवा संघात सामील झाला. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान त्याला एकूण तीन सामने खेळण्याची संधी मिळाली.



संबंधित बातम्या