Anand Mahindra Announces Gift for 6 Cricketers: टीम इंडियाच्या कामगिरीवर आनंद महिंद्रा खुश, 6 डेब्यू खेळाडूंना देणार Thar SUV कार भेट

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पदार्पणात प्रभावी कामगिरी केलेल्या खेळाडूंना महिंद्रा यांनी स्वखर्चातून भेट म्हणून महिंद्रा थार SUV गाडी देण्याचं जाहीर केलं आहे.

मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेच्या ऐतिहासतीक विजयानंतर चहुबाजूने टीम इंडियाचे (Team India) कौतुक केले जात आहे आणि महिंद्रा आणि महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) देखील संघावर खुश आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पदार्पणात प्रभावी कामगिरी केलेल्या खेळाडूंना महिंद्रा यांनी स्वखर्चातून भेट म्हणून महिंद्रा थार SUV गाडी देण्याचं जाहीर केलं आहे. भारतीय संघाला कांगारू देशात अभूतपूर्व यश मिळवून देण्यात शुभमन गिल (Shubman Gill) , मोहम्मद सिराज (Mohammed Siraj), नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि टी नटराजन (T Natarajan) यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या परिश्रम, कष्टाची आणि संकल्पांची पूर्तता करत महिंद्र यांनी ट्विटरवर ही घोषणा केली. शार्दूलने 2018 मधेच कसोटी पदार्पण केलं त्याला दुखापतीमुळे खेळण्याची संधी मिळाली तर कांगारू संघाविरुद्ध अन्य खेळाडूंनी डेब्यू करत दमदार कामगिरी केल्याबद्दल महिंद्रा यांनी पुरस्काराची घोषणा केली. (Mohammed Siraj Favourite Captain: विराट कोहली की अजिंक्य रहाणे कोण आहे मोहम्मद सिराजचा आवडता कर्णधार? जाणून घ्या)

भारताच्या 2-1 अशा कसोटी विजयात या सर्व खेळाडूंनी बॅट आणि बॉलने मोठी भूमिका बजावली. दरम्यान, महिंद्रा यांनी खेळाडूंना भेट देण्याचीही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, 2017 मध्ये सुपर सिरीजचे विजेतेपद मिळवल्यानंतर त्यांनी किदांबी श्रीकांतला एक TUV 300 भेट दिली होती. याआधी शुक्रवारी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लक्झरी कारचा व्हिडिओ पोस्ट केला. आपली नवीन BMW कार हैदराबादच्या रस्त्यावर चालवतानाचा सिराजने व्हिडिओही शेअर केला पोस्ट होता. सिराजने ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या आणि संपूर्ण मालिकेत 13 विकेट्ससह भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. सिराजच्या या योगदानामुळे 32 वर्षांत ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारणारा भारत पहिला संघ ठरला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अ‍ॅडिलेड येथील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, नंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही आणि कांगारू संघाला वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंड संघ भारताला टक्कर देण्यासाठी दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघात 5 फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. मात्र, त्यापूर्वी इंग्लंड संघाचे लक्ष श्रीलंकेविरुद्ध कसोटी विजयावर असेल.