Sri Lanka: श्रीलंकेत कार रेसिंग स्पर्धेदरम्यान भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 23 जखमी (Video)

लष्कराकडून कार रेसिंग इव्हेंट आयोजित करण्याची ही 28 वी वेळ होती,

कार रेसिंग स्पर्धेदरम्यान भीषण अपघात

श्रीलंकेतील उवा प्रांतात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिथे कार रेसिंग दरम्यान झालेल्या अपघातात एका मुलासह किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 23 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल हिल रिसॉर्टमध्ये कार रेसिंगदरम्यान कारचे नियंत्रण सुटले व तिने प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या लोकांना चिरडल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये आठ वर्षांचा मुलगा आणि चार ट्रॅक असिस्टंटचाही समावेश आहे. या घटनेनंतर 23 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पारंपरिक नवीन वर्षाचे सेलिब्रेशन म्हणून दरवर्षी येथे कार रेसिंग इव्हेंटचे आयोजन केले जाते. 2019 मध्ये इस्टर संडे हल्ल्यानंतर ही कार रेसिंग स्पर्धा थांबवण्यात आली होती. आता तब्बल ५ वर्षांनंतर पुन्हा कार रेसिंग इव्हेंट सुरू झाला, मात्र आता या इव्हेंटमध्येच अपघात झाला आहे. 2019 मध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 270 लोकांचा मृत्यू झाला होता. रविवारी घडलेल्या या घटनेनंतर आणि सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा थांबला आहे. लष्कराकडून कार रेसिंग इव्हेंट आयोजित करण्याची ही 28 वी वेळ होती, मात्र यावेळी अपघात झाला. कार रेसिंग स्पर्धेदरम्यान 1 लाखांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. (हेही वाचा: Boat Capsized in Central African Republic: मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये बोट उलटून मोठी दुर्घटना; 50 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, शोध मोहिम सुरू)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)