Ind Wins Asian Champions Trophy: भारताने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले, रोमहर्षक अंतिम सामन्यात मलेशियाचा 4-3 ने केला पराभव
भारत हा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानने तीन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे.
Asian Champions Trophy2023: टीम इंडिया आणि मलेशिया यांच्यात आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत विजेतेपदाचा सामना रंगला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने मलेशियाचा 4-3 असा पराभव करत आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. टीम इंडियाने चौथ्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला आहे. टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. पहिल्या क्वार्टरच्या आठव्या मिनिटाला टीम इंडियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर जुगराज सिंगने ड्रॅग फ्लिकवर गोल करत टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. रोमहर्षक फायनलमध्ये टीम इंडिया एका टप्प्यावर 3-1 ने पिछाडीवर होती, त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाने एका मिनिटात दोन शानदार गोल करत जबरदस्त पुनरागमन केले. यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये चौथा गोल करत टीम इंडियाने चौथ्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता टीम इंडिया सर्वाधिक चार वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा देश बनला आहे.