Shafali Verma Double Century: शेफाली वर्माने इतिहास रचला, भारतासाठी द्विशतक झळकावणारी ठरली दुसरी फलंदाज
भारतीय संघाची सलामीची फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) इतिहास रचला आहे. याआधी केवळ एका भारतीय फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले होते, मात्र आता या यादीत शेफालीचे नावही जोडले गेले आहे.
टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भारताचा सामना 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे, परंतु यादरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमधील कसोटी (IND W vs SA W) सामनाही सुरू झाला आहे. चेन्नईत आजपासून मालिकेचे सामने सुरू झाले आहेत. दरम्यान, भारतीय संघाची सलामीची फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) इतिहास रचला आहे. याआधी केवळ एका भारतीय फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले होते, मात्र आता या यादीत शेफालीचे नावही जोडले गेले आहे. मिताली राजने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले होते. मिताली राजने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध 214 धावांची इनिंग खेळली होती. याआधी आणि त्यानंतर कोणत्याही महिला फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती, मात्र आता शेफालीने नवा विक्रम केला आहे. चौकार आणि षटकारांच्या जोरावर तिने 200 हून अधिक धावसंख्येची भर घातली. ती 187 धावांवर खेळत होती. दरम्यान, लागोपाठ दोन षटकार मारत तिने थेट 199 पर्यंत मजल मारली आणि त्यानंतर एकेरी घेत तिने द्विशतकही पूर्ण केले.