'माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला, मी पुरस्कार परत करणार'; आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने खोटे पत्र व्हायरल
मात्र हे पत्र बनावट असल्याचे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
रविवारी (16 एप्रिल) खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये महाराष्ट्र भूषण सोहळा पार पडला. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र या सोहळ्याला मोठे गालबोट लागले. पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने अनेक लोकांचा मृत्यू झाला. आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. असे कुठलेही पत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने जारी करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या खोट्या व्हायरल पत्रात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. या पत्रात आपल्याला जबरदस्तीने पुरस्कार घ्यायला लावण्यात आल्याचे म्हटले आहे. पुढे म्हटले आहे की, माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला. माझ्या साधकांसाठी मंडप टाकला नाही. झालेल्या घटनेची पूर्ण जबाबदारी घेऊन मी श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे बनावट पत्रात नमूद करण्यात आले होते. (हेही वाचा: सरकारविषयी बोलताच 'इडीची बिडी' लगेच पेटते; छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला टोला)
पहा व्हायरल झालेले खोटे पत्र-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)