Raj Thackeray Shared Railway Ministry Recruitment: राज ठाकरेंनी शेअर केली रेल्वे मंत्रालयातील भरतीची जाहिरात; मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना
जास्तीत-जास्त मराठी तरुणांना या जागांवर नोकरी मिळावी, यासाठी राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या आहेत.
Raj Thackeray Shared Railway Ministry Recruitment: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रेल्वे मंत्रालयातील भरतीची जाहिरात (Railway Ministry Recruitment) आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहे. जास्तीत-जास्त मराठी तरुणांना या जागांवर नोकरी मिळावी, यासाठी राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात पोस्ट शेअर करताना राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. (हेही वाचा - Raj Thackeray On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी कोण, कालांतराने पुढे येईल- राज ठाकरे)