राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगडावर 'रोपवे'ने येणार; राखला शिवभक्तांच्या भावनेचा आदर
येत्या 6 डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड किल्ल्याला भेट देत आहेत
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगडावर रोपवेने येणार आहेत. छत्रपती संभाजी राजेंनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत राष्ट्रपती रायगडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो.’
येत्या 6 डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड किल्ल्याला भेट देत आहेत. राष्ट्रपती आपल्या हॅलिकॉप्टरने रायगडावर उतरतील अशी माहिती समोर आली होती. त्याला शिवप्रेमींनी विरोध दर्शविला. राष्ट्रपतींचे हॅलिकॉप्टर किल्ले रायगडावर उतरु देणार नाही, अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली होती. त्यानंतर आता राष्ट्रपती महोदयांनी रोपवेने येण्याचा निर्णय घेतला आहे.