'Laapataa Ladies' Campaign: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने सुरु केली 'लापता लेडीज' मोहीम; राज्यातील हरवलेल्या मुली-महिलांच्या मुद्द्यावर टाकला प्रकाश
सरकारच्या अपयशामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.
'Laapataa Ladies' Campaign: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सत्ताधारी महायुती आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील एक गंभीर मुद्दा उपस्थित करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात काँग्रेसने 'लापता लेडीज' मोहीम सुरू केली असून, त्यासाठी एक पोस्टर तयार करण्यात आले आहे. या पोस्टरद्वारे कॉंग्रेस राज्यातील हरवलेल्या मुली आणि महिलांच्या मुद्द्यावर भाष्य करत आहेत. महाराष्ट्रातून दरवर्षी 64 हजार मुली बेपत्ता होत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे पोस्टरमध्ये लिहिले आहे. या पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी साधर्म्य असलेल्या छायचित्रांचाही समावेश आहे. काँग्रेसच्या या प्रचारात विशेषत: राज्य सरकारमधील गृहखात्याची जबाबदारी असलेले देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. सरकारच्या अपयशामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. ही पोस्टर्स महाराष्ट्रात सर्वत्र चिकटवण्यात आली आहेत.
बदलापूरमध्ये गेल्या महिन्यात दोन शाळकरी मुलींवर झालेल्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे अभियान सुरू केले आहे. यामध्ये विशेषत: देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. राज्यात बेपत्ता होणाऱ्या महिलांपैकी 10 टक्के महिला घरी परतत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विधानसभेत सांगितले होते. (हेही वाचा: PM Narendra Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; ठाण्यातील लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात होणार सहभागी)
काँग्रेसने सुरु केली 'लापता लेडीज' मोहीम-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)