दारुच्या नशेत सापाला चावला माणूस, कुटुंबीयांनी केले मेलेल्या सापावर अंत्यसंस्कार; उत्तर प्रदेश राज्यातील एटा जिल्ह्यात घडली विचित्र घटना
त्याची प्रकृती गंभीर असल्याने सध्या त्याला दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सांगण्यारुनच त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राजकुमार याच्या कुटुंबीयांनी राजकुमार याने चावा घेतलेल्या सापाचे अंत्यसंस्कार केले आहेत.
माणसाला साप चावला अशा घटना आजवर आपण नेहमी ऐकल्या असतील. पण, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील एटा जिल्ह्यात एक विचित्रच घटना घडली. एटा (Etah) जिल्ह्यातील असरौली गावात एका दारुड्या माणसाला साप चावला. या सापाचा त्या दारुड्याला इतका राग आला की, रागाच्या भरात त्याने सापालाच उलटा चावा (Drunk Man Bites Snake) घेतला. त्याने सापाला केवळ चावाच घेतला नाही तर, चाऊन चाऊन सापाचे थेट तुकडेच केले. ही घटना रविवारी (28 जुलै 2019) घडली. या विचित्र प्रकाराची चर्चा परिसरात भलतीच रंगली आहे.
प्राप्त माहितीनुसार, असरौली गावात राजकुमार नावाचा एक यूवक राहतो. या युवकाला दारु पिण्याचे प्रचंड व्यसन आहे. रविवारीही तो दारुच्या नशेत होता. दरम्यान, त्याला साप चावला. राजकुमार याचे वडील बाबू राम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'माझा मुलगा दारुच्या नशेत होता. दारुच्या नशेत असलेल्या राजकुमार याला सापाने चावा घेतला. त्यानंतर मग राजकुमार यानेही सापाला चावा घेतला. पण, सापाला चावत असताना त्याने सापाचे तुकडे तुकडे केले. सध्या माझ्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.' दरम्यान, 'आम्ही इतके गरीब आहोत की, त्याच्यावर उपचार करण्याइतकेही आमच्याकडे पैसे नाहीत', असेही राजकुमार याच्या वडीलांनी सांगितले.
राजकुमार याचा पराक्रम पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, सध्या राजकुमार याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, हा रुग्ण जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याने मला सांगितले की, त्याने सापाचा चावा घेतला. मला वाटले की, माझ्या ऐकण्यात काहीतरी गडबड झाली आहे. मला वाटले की, राजकुमारलाच साप चावला आहे. मी पुन्हा त्याला विचारले तर त्याने सांगितले की, आगोदर साप मला चावला म्हणून मग मी त्याला (सापाला) चावलो. (हेही वाचा, मुंबई: सर्पदंश झाल्यावर चावलेल्या सापासोबत मायलेकी रुग्णालयात, डॉक्टरही आश्चर्यचकीत; सोनेरी चाळ येथील घटना)
दरम्यान, राजकुमार याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने सध्या त्याला दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सांगण्यारुनच त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राजकुमार याच्या कुटुंबीयांनी राजकुमार याने चावा घेतलेल्या सापाचे अंत्यसंस्कार केले आहेत.