Tallest Woman Alive: तुर्कीची 24 वर्षीय Rumeysa Gelgi ठरली सर्वात उंच जिवंत असलेली महिला; 7'7 इंच आहे उंची, फिरण्यासाठी करते व्हीलचेअरचा वापर

अशा आश्चर्यकारक गोष्टी पाहून कधी कधी यावर विश्वास ठेवणे कठीण होते. आता सात फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या तुर्की महिलेने सर्वात उंच जिवंत असलेल्या महिलेचा (Tallest Woman Alive) किताब पटकावला आहे

Rumeysa Gelgi (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगामध्ये अनेक गोष्टींचे विश्वविक्रम होत असतात. अशा आश्चर्यकारक गोष्टी पाहून कधी कधी यावर विश्वास ठेवणे कठीण होते. आता सात फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या तुर्की महिलेने सर्वात उंच जिवंत असलेल्या महिलेचा (Tallest Woman Alive) किताब पटकावला आहे. रुमेयसा गेल्गी (Rumeysa Gelgi) असे या 24 वर्षीय मुलीचे नाव असून तिची उंची 7 फुट 7 इंच इतकी भरली आहे. याआधी या मुलीचे नाव ‘सर्वात उंच टीनेजर मुलगी’ म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाले होते.

वीव्हर सिंड्रोम (Weaver Syndrome) नावाच्या दुर्मिळ अवस्थेमुळे या मुलीच्या उंचीमध्ये सतत वाढ होत आहे. महत्वाचे म्हणजे इतक्या जास्त उंचीमुळे या मुलीला फिरण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करावा लागत आहे. तिने 2014 मध्ये 'सर्वात उंच किशोरवयीन' म्हणून तिचे पहिले विश्वविक्रम विजेतेपद पटकावल्यापासून, या दुर्मिळ आजाराबाबत जन्गागृती करत आहे. याबाबत ती म्हणते की, 'प्रत्येक गैरसोय स्वतःसाठी फायद्यात बदलली जाऊ शकते, म्हणूनच तुम्ही कोण आहात याबाबतचे सत्य स्वीकारा, तुमच्या क्षमतेची जाणीव ठेवा आणि सर्वोत्तम प्रयत्न करा.'

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सांगितले की, दुसऱ्यांदा रेकॉर्ड बुकमध्ये तिचे नाव नोंदवले गेले असून तिचे याठिकाणी पुन्हा एकदा स्वागत आहे. अजून एक गोष्ट म्हणजे या मुलीचे हातही सर्वसामान्य हातापेक्षा लांब आहेत.

रुमेयसाने पूर्वी सांगितले होते की, तिला तिच्या दिसण्याबाबत बाहेरिक लोकांकडून  नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत पण आता ती त्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला इतरांपेक्षा वेगळे असणे व वेगळे दिसणे आवडते, असे ती म्हणते. ही गोष्ट मला इतरांपासून खास बनवते व त्याबाबत मी खुश आहे, असेही तिने सांगितले आहे.

अमेरिकेतील नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर रेअर डिसऑर्डरने म्हटले आहे की, वीव्हर सिंड्रोम हा सामान्यतः जन्मापूर्वी सुरू होतो. कधीकधी यामध्ये शरीराचे स्नायू वाढतात, डोळे रुंद होतात, कपाळ विस्तुत होते, पायाची व हाताची लांबीही वाढते तसेच कानाचा आकारही मोठा होतो. (हेही वाचा: Australia: मुलीचे अतिवजन असल्याने वॉटर पार्कमध्ये स्लाइडमध्ये जाण्यास नकार, अपमानानंतर आईने शिकवला धडा)

दरम्यान, जगातील सर्वात उंच माणूस, सुल्तान कोसेन हा देखील तुर्कीचा आहे. 2018 मध्ये त्याची उंची 8'2.8 इंच इतकी मोजली गेली होती. जगातील सर्वात उंच महिलेचा जागतिक विक्रम चीनमधील झेंग जिनलियनच्या नावावर आहे. 1982 मध्ये तिच्या मृत्यूपूर्वी तिची उंची 8'1 इतकी भरली होती.