कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले? 22 हजार महिला होणार विधवा?; सोशल मिडीयावर पसरलेल्या अफवेबाबत पोलिसांत तक्रार दाखल

सरकारने यावर मात करण्यासाठी 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली आहे मात्र तरी दिवसेंदिवस या विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे.

कोल्हापूरची अंबाबाई (Photo Credit : Voot)

सध्या देशावर कोरोना व्हायरसचे संकट चालून आले आहे. सरकारने यावर मात करण्यासाठी 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली आहे मात्र तरी दिवसेंदिवस या विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशात देशात भीतीचे वातावरण असताना अफवा आणि फेक बातम्यांना चांगलेच पेव फुटले आहे. सध्या Whatsaap वर असाच एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुळजापूरच्या भवानी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र अचानक तुटले असल्याचे नमूद केले आहे. इतकेच नाही तर काही मेसेजेसमध्ये हे मंगळसूत्र कोल्हापूरच्या अंबाबाईचे असल्याचे सांगण्यात आले आहे. ही गोष्ट संकटाची नांदी असून त्यावरच उपायही या मेसेजमध्ये सांगितला आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही ही अफवा असल्याचे सांगितले आहे.

काय आहे मेसेज?

‘तुळजापूरच्या (काही मेसेजेसमध्ये कोल्हापूरची अंबाबाई) भवानी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र अचानक तुटले आहे, त्या मंगळसूत्रातील 22 हजार मनी हरवले आहेत. त्यामुळे 22 हजार महिला विधवा होणार आहेत. हा एक अशुभ संकेत असून त्यावर तिथल्या ब्राम्हणांनी उपाय सांगितला आहे. सर्व स्त्रियांनी हळकुंड दोऱ्यात बांधून ते गळ्यात घालावे आणि भिंतीवर स्वस्तिक काढावे’. असा हा मेसेज आहे. भारतातील अंधश्रद्धा पाहता बघता बघता हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला. सध्या देश एक मोठ्या संकटाशी सामना करत असताना लोकांची अशा प्रकारे चेष्टा करण्याचे काम काही समाजकंटक करत आहे.

याबाबत अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही अफवा असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन केले आहे. (हेही वाचा: जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' OLX वर विक्रीला ठेवण्याची चेष्टा; 30,000 कोटी किंमत)

या प्रकरणावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात, ‘शुक्रवारपासून हा मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये एका मोठ्या संकटाबद्दल लिहिले असल्याने त्याबाबत भक्तांकडून विचारणा होत होती. मात्र देवीचे मंगळसूत्र व सर्व दागिने सुस्थितीत आहेत. हा मेसेज म्हणजे निव्वळ अफवा असून त्यावर विश्वास ठेऊ नये.’ या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.