Kolhapur Shree Mahalakshmi Ambabai: अंबाबाईच्या चेहऱ्यावरील भाव बदलले; देवीच्या मूर्तीच्या सौंदर्याला बाधा, वज्रलेप वादाच्या भोवऱ्यात
मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी तिच्यावर अनेक वेळा वज्रलेप करण्यात आले आहेत. मागच्या नवरात्रोत्सवावेळी अचानक 18 आणि 19 सप्टेंबर रोजी एका रात्रीत मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पार पाडली होती. मात्र त्यानंतर देवीच्या नाकाचा आकार पूर्णपणे बदलला.
राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली कोल्हापूरची अंबाबाई (Kolhapur Shree Mahalakshmi Ambabai) ही कोट्यावधी भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. दरवषी अंबाबाईच्या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात, सोहळे पार पडतात. यावेळी राज्यासह देशभरातील भक्त अनेक तास रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतात. आता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून एक मोठी बाब समोर येत आहे. देवीच्या मूर्तीच्या सौंदर्याला बाधा निर्माण झालेली आहे. देवीच्या मूर्तीला अनेकवेळा वज्रलेप केल्याने आता मूर्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले आहेत. यामुळे मूर्तीच्या संवर्धनासाठी केला जाणारा वज्रलेप आणि रासायनिक प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
अंबाबाईच्या मंदिरातील मूर्ती ही अतिशय प्राचीन मूर्ती आहे. या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी तिच्यावर अनेक वेळा वज्रलेप करण्यात आले आहेत. मागच्या नवरात्रोत्सवावेळी अचानक 18 आणि 19 सप्टेंबर रोजी एका रात्रीत मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पार पाडली होती. मात्र त्यानंतर देवीच्या नाकाचा आकार पूर्णपणे बदलला. सप्टेंबरमध्ये संवर्धन प्रक्रिया करून देखील 26 जानेवारीला देवीच्या डोळ्या शेजारील भागातील कपचा निघून पडला, तसेच मूर्तीच्या चेहऱ्याच्या काही भागाला इजा पोहोचली.
ही बाब कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती, मात्र याबाबत सरकार, पुरातत्व विभाग आणि देवस्थान समितीकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. मूर्तीची होत असलेली झीज पाहून मूर्तीला स्नान घालणे आणि दुग्धाभिषेक करणे बंद करण्यात आले आहे. भाविकांनाही देखील पितळी उंबराच्या बाहेरून देवीचे दर्शन दिले जात आहे. (हेही वाचा: Mumbai: मुंबई सुशोभीकरण प्रकल्पासाठी बीएमसीकडून 110 कोटी रुपयांच्या 320 नवीन प्रकल्पांची घोषणा)
सध्या मूर्तीचे निरीक्षण केल्यावर दिसून येते की, मूर्तीवर अनेक ठिकाणी खपले निघाली आहेत. मूर्तीचे पाय, कानाकडील भाग, दागिने हे पूर्णपणे झिजले आहेत. देवीचे वाहन असणारे सिंहाची पाठीमागील बाजू पूर्णपणे दिसेनाशी झाली असून सिंहाचा चेहराही अस्पष्ट झाला आहे. अशाप्रकारे मूर्तीची अवस्था अतिशय नाजूक झाली असून, तिच्या संवर्धनाबाबत तातडीने काही ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2023 08:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

