'कचरा सुका और गिल्ला'... PMC चे सफाई कामगार महादेव जाधव सोशल मीडियावर व्हायरल; कचर्याच्या वर्गीकरणावर करत आहेत खास गाण्यामधून जागृती (Watch Video)
सध्या ते पुणे शहरासोबतच इंटरनेटमुळे जगभरात व्हायरल झाले आहेत.
महाराष्ट्रासह देशभरात 'स्वच्छ भारत' योजनेअंतर्गत मागील काही महिन्यांपासून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र सध्या सोशल मीडीयावर पुणे महानगर पालिकेचे एक सफाई कामगार चांगलेच व्हायरल होत आहेत. महादेव जाधव (Mahadev Jadhav) असं या सफाई कामगाराचं नाव असून खास गाण्याच्या माध्यमातून महादेव पुणे शहरात कचर्याच्या वर्गीकरणाबाबत जनजागृती करत आहे. प्रसिद्ध बॉलिवूडच्या गाण्यावर महादेव गात असलेलं गाणं सोशल मीडीयामध्ये व्हायरल झालं आहे. अनेकांनी त्यांच्या प्रयत्नांच्या कौतुक केलं आहे.
ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये महादेव जाधव यांनी आपल्याला कोणी गाणं सांगायला सांगत नाही पण समाजात कचर्याच्या वर्गीकरणासाठी हटके गाण्याच्या माध्यमातून मी अधिक लोकांपर्यंत पोहचू शकतो. लोकांनी कचरा टाकतानाच वर्गीकरण केल्यास महापालिकेसमोरील अनेक प्रश्न सुटतील. तसेच सफाई कामगारांना यामुळे कचरा टाकण्यास, उचलण्यास मदत होणार आहे. महादेव जाधव हे मागील 25 वर्ष पुणे महानगर पालिकेमध्ये काम करत आहेत. सध्या ते पुणे शहरासोबतच इंटरनेटमुळे जगभरात व्हायरल झाले आहेत.
महादेव जाधव यांचा व्हिडिओ
महादेव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार आता हळूहळू समाजामध्ये कचार्याच्या वर्गीकरणामुळे जनजागृती होत आहे. लोकांमध्ये सजगता वाढत आहे. सध्याच्या घडीला सुमारे 60% लोकं कचर्याचं वर्गीकरण करतात. महादेव जाधव हे सफाई काम करण्यासोबतच इतर वेळेस गाणी रचतात. त्यांनी कचरा वर्गीकरणाच्या थीमवरही काही गाणी बनवली आहेत. त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये बॉलीवूड गाण्यांना रिमिक्स अंदाजात सादर केलं जातं. याच्या माध्यमातून ते स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणं, ओला - कचरा सुका कचरा वेगळा करणं या बद्दल खास संदेश दिला आहे. पुणे महापालिकेने 2005 मध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचे एक कलापथक स्थापन केले होते. या कलापथकात जाधव यांचाही सहभाग होता. जाधव यांनी स्वच्छतेचा संदेश देणारी अनेक गाणी रचली आहेत.