मुंबई: TikTok नाद लै वंगाळ; टिकटॉक स्टारला भेटण्यासाठी 14 वर्षीय मुलीचा घरातून पोबारा; वडाळा पोलिसांच्या सतर्कतेने वेळीच घरवापसी
या मुलीकडं असलेला मोबाईल हाच पोलीस तपासासाठी महत्त्वाचा दुवा ठरला. पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करत मुलीचा माग काढला. ही मुलगी घरातून शनिवारी बाहेर पडली. आरपीएफ पोलिसांनी तिचा ताबा रविवारी घेतला.
TikTok APP हे अनेकांच्या आनंदाचे कारण ठरत असले तरी, तरुणाईच्या पालकांसाठी मात्र हे अॅप डोक्याला तापच होऊन बसले आहे. असाच प्रकार महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) शहरात घडला आहे. टीकटॉकच्या वेडापाई एका 14 वर्षीय मुलीने आपले घर सोडले आहे. ही तरुणी टिकटॉकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या एका 16 वर्षीय टीकटॉक स्टार (Tik Tok Star) मुलाला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडल्याचेच सांगितले जात आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घर सोडण्यापूर्वी या मुलीनं आपल्या आईला एक पत्र लिहून याची माहिती दिली. हे पत्रंही भावनिक स्वरुपाचं होतं. ही मुलगी नेपाळमधील टिकटॉक स्टार रियाज अली याला दिल्ली भेटण्यासाठी दिल्लीला निघाली होती. रिजाय अली हा एका कार्यक्रमासाठी दिल्ली येथे येणार होता. दरम्यान, या प्रकाराची माहिती वडाळा पोलिसांना मिळाली. वडाळा पोलीस वेळीच सतर्क झाले. त्यांनी या मुलीला ताब्यात घेऊन तिची समजूत काढली आणि तिला पुन्हा घरी पाठवले.. पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे या मुलीची घरवापसी झाली. (हेही वाचा, All about TikTok: तुम्हीपण 'टिक टॉक' Video बनवता? मग आगोदर वयाचा अंदाज घ्या)
घर सोडताना या मुलीने आईला भावनिक पत्र लिहीलं आणि सोबत आपला मोबाईल घेऊन तिनं घर सोडलं. या मुलीकडं असलेला मोबाईल हाच पोलीस तपासासाठी महत्त्वाचा दुवा ठरला. पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करत मुलीचा माग काढला. ही मुलगी घरातून शनिवारी बाहेर पडली. आरपीएफ पोलिसांनी तिचा ताबा रविवारी घेतला. त्यांनी तिला बालसुधारगृहात पाठवले. त्यानंतर या मुलीचा ताबा वडाळा पोलिसांना मिळाला. त्यांनी तिला ताब्यात घेऊन तिच्या कुटुंबीयांकडे सोपवले. सध्या ही मुलगी सुरक्षीत असल्याची माहिती आहे.