Fact Check: मुंबईतील मुसळधार पावसामुळे Bandra-Worli Sea Link वर उंचच उंच लाटा दाखवणारा व्हायरल व्हिडिओ फेक

मात्र त्यातील नेमके खरे व्हिडिओ कोणते याची पडताळणी न करता अनेक जुने किंवा चुकीचा दावा करुन व्हिडिओज शेअर करण्यात आले.

Bandra worli sea link fake video (Photo Credits: Video Grab)

मुंबई (Mumbai) मध्ये गेल्या दोन दिवसांपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकारांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर सखल भाग जलमय झाले. मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती फोटोज, व्हिडिओजमधून आपल्या समोर आली. दरम्यान हे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आले. मात्र त्यातील नेमके खरे व्हिडिओ कोणते याची पडताळणी न करता अनेक जुने किंवा चुकीचा दावा करुन व्हिडिओज शेअर करण्यात आले. यामुळे नागरिकांची चिंता अधिकच वाढली. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (मुंबईतील एन. एस. पाटकर मार्ग येथील रस्त्याच्या कडेला असलेली भिंत कोसळली तर नायर हॉस्पिटल जलमय, पहा व्हिडिओ)

या व्हिडिओत समुद्रावर उभारण्यात आलेला एक ब्रिज दिसत आहे. तुफानी पावसामुळे समुद्राला उधाण आले असून समुद्रात उंचच उंच लाटा उसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात ब्रिजवरुन एक बाईकस्वार जात आहे. यात समुद्राच्या लाटा पूलावरुन जात असल्याचे दिसत आहे. निसर्गाचे हे भयावह रुप मुंबईतील पाहायला मिळाले असून हा वरळी सी लिंक वरील व्हिडिओ असल्याचे युजरने म्हटले आहे.

पहा व्हायरल व्हिडिओ:

वरळी सी लिंक पूर्णपणे तारेने जोडलेला आहे. तसंच त्यावर दुचाकी वाहनांना परवानगी नाही. विशेष म्हणजे व्हिडिओतील ब्रिज जुनाट दिसत आहे. वरळी सी लिंग काही वर्षांपूर्वीच बांधला असून तो नवा दिसतो. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवलेला ब्रिज वरळी सी लिंक नसल्याचे स्पष्ट होते. तसंच या व्हायरल व्हिडिओवर विविध कमेंट्स येत आहेत. त्यात काही युजर्स हा ब्रिज मेक्सिको मधील असल्याचे म्हणत आहेत. तर हा व्हिडिओ लक्ष्मद्विप येथील असून ऑगस्ट 2017 चा आहे, असे काही युजर्सचे म्हणणे आहे.

दरम्यान मुंबईत आज देखील पावसाचा जोर कायम राहणार असून दुपारी 1 वाजून 51 मिनिटांनी समुद्रात 4.33 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये.