Fact Check: कोरोना व्हायरसच्या लसीसाठी 500 रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या पोस्टमागील सत्यता
व्हायरल पोस्टमध्ये दावा केला गेला आहे की, नवी कोविड19 ची लसीकरण मोहिम 1 मार्च पासून सुरु होणार आहे.
Fact Check: सोशल मीडियात सध्या एक पोस्ट तुफान व्हायरल होत असून ज्यामध्ये कोरोना संबंधित काही दावे करण्यात आले आहेत. व्हायरल पोस्टमध्ये दावा केला गेला आहे की, नवी कोविड19 ची लसीकरण मोहिम 1 मार्च पासून सुरु होणार आहे. यामध्ये कोविड19 च्या लसीसाठी500 रुपये द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये असा सुद्धा दावा केला गेला आहे की, 40 टक्के लस ही ज्यांची नावे रजिस्टर आहेत त्यांना प्रत्येक दिवशी दिली जाणार आहे. त्याचसोबत 60 वर्षावरील व्यक्तींना लस घ्यायची असल्यास त्यांना सोबत मतदान कार्ड आणि पॅनकार्ड आणणे आवश्यक असणार आहे.परंतु या व्हायरल पोस्ट बद्दल पीआयबी कडून फॅक्ट चेक करण्यात आले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, व्हायरल होणारी पोस्ट खोटी आहे. केंद्राकडून अशा पद्धतीचे कोणतेच नियम लागू करण्यात आलेले नाही.
पीआयबीने एका ट्विटच्या माध्यमातून असे म्हटले की, #COVID19 च्या लसीकरणाच्या पुढील टप्प्या संबंधित एका व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये काही दावे करण्यात आले आहेत. परंतु पीआयबी हे सर्व दावे खोडून काढत असून ते खोटे आहेत.(FACT CHECK Lockdown In Maharashtra: महाराष्ट्र 1 मार्चपासून खरंच होणार लॉकडाऊन? जाणून घ्या काय आहे सत्य)
Tweet:
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या पुढील लसीकरणाच्या अभियानाबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत असे ठरले की, 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या वक्तींसह अन्य आजार आणि 45 वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा असे म्हटले की, दुसऱ्या टप्प्यात 10 हजार शासकीय केंद्रांवर निशुल्क लस दिली जाणार आहे. त्यांनी असे ही म्हटले की, खासगी क्लिनिकमध्ये सुद्धा लस दिली जाणार आहे. त्यासाठी मात्र नागरिकांना शुल्क मोजावे लागणार आहेत. परंतु हे शुल्क किती असणार यावर विचार केला जात असून त्यावर दोन-तीन दिवसात निर्णय जाहीर केला जाणार आहे.