Fact Check: देशात 25 जानेवारीपर्यंत Lockdown जाहीर केल्याची Fake News व्हायरल; जाणून घ्या सत्य
तज्ज्ञांच्या मते देशात महामारीची तिसरी लाट सुरू झाली असून, फेब्रुवारीच्या सुरुवातीला ती शिगेला पोहचू शकते
देशात कोरोना विषाणूचे (Coronavirus) नवीन रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना व त्यात आता ओमायक्रॉन प्रसार वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये शनिवार व रविवार आणि रात्री कर्फ्यूसह अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या या तिसर्या लाटेमध्ये दिल्ली, मुंबई, तामिळनाडू, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील निर्बंध तर अतिशय कडक आहेत. या पार्श्वभुमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची (Lockdown) चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट होत आहेत ज्यामध्ये लॉकडाऊनबाबत भाष्य करण्यात आले आहे.
सोशल मीडियात एका न्यूज चॅनलचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की- 'आज 13 जानेवारी 2022 ब्रेकिंग - उद्यापासून 25 जानेवारीपर्यंत संपूर्ण भारत बंद - पीएम मोदी. शॉप मॉल मार्केट देशातील सर्व काही बंद.’ सध्या ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून, अनेकांनी ती पुढे पाठवण्यास सुरुवात केली आहे.
आता भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) या दिशाभूल करणाऱ्या बातमीबाबत सत्य काय ते सांगितले आहे. पीआयबी फॅक्ट चेक टीमने ट्विट केले आहे की, 'पंतप्रधानांनी 25 जानेवारीपर्यंत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली नाही. लॉकडाऊन संदर्भात सोशल मीडियावर शेअर केले जाणारे दावे हे पूर्णतः खोटे आहेत. अशा पोस्ट फक्त लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे योग्य आणि खऱ्या माहितीसाठी फक्त अस्सल स्रोतांवर विश्वास ठेवा.’ (हेही वाचा: Scam Alert: कोरोना फंड अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 5000 रूपये दिले जात असल्याचा खोटा मेसेज वायरल; PIB Fact Check ने केला खुलासा)
दरम्यान, देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते देशात महामारीची तिसरी लाट सुरू झाली असून, फेब्रुवारीच्या सुरुवातीला ती शिगेला पोहचू शकते. आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी दावा केला की, जानेवारीच्या अखेरीस देशात महामारीचा उच्चांक येईल, या काळात दररोज 4 ते 8 लाख प्रकरणे समोर येऊ शकतात.