Fact Check: शाकाहार आणि धुम्रपान करणाऱ्या लोकांना COVID-19 चा धोका कमी? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य
लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. आवश्यक औषधांची कमतरता आहे, रुग्णालयात पुरेसे बेड्स नाहीत, ऑक्सिजनसाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. भीतीच्या या वातावरणात काही चुकीची माहितीही नकळत लोकांपर्यंत पोहोचत आहे.
देशात ज्या प्रमाणात कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग वाढत आहे, त्याचप्रमाणात अफवांचेही पेव फुटले आहे. कोरोनावरील घरगुती उपचारांपासून ते रुग्णालयातील ट्रीटमेंटपर्यंत अनेक दिशाभूल करणाऱ्या बातम्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. आता, धूम्रपान (Smokers) करणारे आणि शाकाहारी लोकांमध्ये (Vegetarians) 'सीरो पॉझिटिव्हिटी' कमी असल्याचे, यासह 'ओ' रक्तगटाच्या लोकांनाही कोरोना विषाणूचा धोका कमी संभवत असल्याची बातमी व्हायरल होत आहे. यासाठी सीएसआयआरच्या (CSIR) सर्वेक्षणाचा दाखला दिला जात आहे. अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. मात्र ही माहिती पूर्णतः खोटी असल्याचे समोर आले आहे.
देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गंभीर स्थिती ओढवली आहे. लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. आवश्यक औषधांची कमतरता आहे, रुग्णालयात पुरेसे बेड्स नाहीत, ऑक्सिजनसाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. भीतीच्या या वातावरणात काही चुकीची माहितीही नकळत लोकांपर्यंत पोहोचत आहे. अशीच एक दिशाभूल करणारी माहिती व्हायरल होत आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, शाकाहारी आणि धूम्रपान करणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदच्या सर्वेक्षणाच्या आधारे हा दावा केला गेला आहे.
मात्र आता जेव्हा पीआयबीच्या फॅक्ट चॅट विंगने या बातमीची सत्यता तपासणी केली तेव्हा त्यात काहीतरी वेगळेच आढळले. पीआयबी फॅक्ट चेकला मीडिया रिपोर्टमधील हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले आहे की, ‘सध्या शाकाहारी आहार आणि धूम्रपान कोविड-19 पासून संरक्षण देऊ शकते, अशा निष्कर्ष कोणत्याही सीरॉलॉजिकल अभ्यासानुसार काढला गेला नाही. अशा प्रकारे पीआयबी फॅक्ट चेकने माध्यमांच्या वृत्तामधील हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: पुदुच्चेरी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने COVID-19 वरील घरगुती उपाय शोधल्याचा दावा, WHO नेही दिली मंजुरी? जाणून घ्या व्हायरल पोस्टमागील सत्य)
दरम्यान, सध्याच्या काळात अनेक खोट्या बातम्या सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. लोक अशा बातम्याची सत्यता न पडताळता त्या बातम्या पुढे पाठवतात. यामुळे लोकांमध्ये चुकीची माहिती पसरून त्यांची दुशाभूल होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही बातमी पुढे पाठवण्याआधी ती खरी आहे की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे.