Fact Check: कोरोना व्हायरस लॉकडाऊन कालावधी महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत? व्हायरस बातमीमागचे सत्य काय?
हे पोर्टल www.maharashtratoday.co.in नावाने कार्यरत आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा दावा करत म्हटले होते की, राज्यातील लॉकडाऊन कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे.
सोशल मीडियावर महाराष्ट्रातील लॉकडाऊन (Lockdown) कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवला असल्याची एक पोस्ट व्हायरस झाली आहे. या पोस्टमध्ये एका संकेतस्थळाची लिंकही देण्यात आली आहे. मात्र लेटेस्टली मराठीने या वृत्ताची पुष्टी केली असता व्हायरल पोस्टमध्ये बातमी रुपाने करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे पुढे आले. दरम्यान, व्हायरल पोस्टमधील लॉकडाऊन बाबत करण्यात आलेल्या दाव्याची लिंक आता संबंधित संकेतस्थळाने हटवली आहे. मात्र, तोपर्यंत व्हाट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर आदी समाजमाध्यमांवर ही पोस्ट व्हायरल झाली होती.
व्हायरल पोस्टमध्ये महाराष्ट्र टुडे नावाच्या एका पोर्टलच्या बातमीची लिंक देण्यात आली होती. हे पोर्टल www.maharashtratoday.co.in नावाने कार्यरत आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा दावा करत म्हटले होते की, राज्यातील लॉकडाऊन कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र टुडेने नंतर स्पष्टीकरण देत म्हटले की, आमच्या वृत्ताचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. "महाराष्ट्रातही न्यायालायचा अंतरिम आदेश 30 एप्रिलपर्यंत जारी: उच्च न्यायालय" असा आमच्या वृत्तात उल्लेख नव्हता. काही लोकांनी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली. मुळात "महाराष्ट्रातही न्यायालायचा अंतरिम आदेश 30 एप्रिलपर्यंत जारी: उच्च न्यायालय'' मुळात आमचे हे वृत्त केवळ अंतरिम आदेशाबाबत भाष्य करते. यात कोठेही लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याचा उल्लेख नाही. तरीही सोशल मीडियावर पसरलेल्या वृत्तामुळे कोणाच्या भावाना दुखावल्या असतील तर आम्ही क्षमा मागतो. (हेही वाचा, Fact Check: अजीम प्रेमजी यांनी कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईत 50,000 कोटींचे केले दान? जाणून घ्या सत्य)
दरम्यान, वास्तव असे की, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढविण्याबाबत कोणत्याही प्रकारचे आदेश दिले नाहीत. तसेच त्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. उच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले आहे की, विविध बाबतीत काढण्यात आलेले अंतरीम निर्देश 30 एप्रिलपर्यंत जारी राहतील. मात्र, वाचकांनी हे ध्यानात घ्यावे की हे आदेश लॉकडाऊन वाढविणे किंवा कमी करणेय याबाबत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविण्याबाबतचे सोशल मीडियावरील वृत्त दिशाभूल करणारे आहे.