अबब! रुग्णाच्या शरीरातून डॉक्टरांनी काढली तब्बल 7.4 किलोची किडनी
या किडनीचे वजन तब्बल 7.4 किलो एवढं आहे. आश्चर्य म्हणजे ही किडनी जगातील तिसरी सर्वात मोठी किडनी आहे.
दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयामध्ये यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांनी एका रुग्णाच्या शरीरातून देशातील सर्वात वजनी किडनी (Kidney) काढली आहे. या किडनीचे वजन तब्बल 7.4 किलो एवढं आहे. आश्चर्य म्हणजे ही किडनी जगातील तिसरी सर्वात मोठी किडनी आहे. ही किडनी बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना तब्बल 2 तासांचा काळावधी लागला. डॉ. सचिन शर्मा, डॉ. सचिन कथूरिया आणि डॉ. जुहील नानावटी यांनी ही शस्त्रक्रिया केली. साधारणत: किडनीचे वजन 120 ते 150 ग्रॅम असते. (हेही वाचा - अबब! 15 कोटी रुपयांहूनही महाग आहे हा रेडा; 6 फूट उंच तर, 14 फूट लांब, वजन फक्त 1300 किलो)
दरम्यान, शस्त्रक्रिया करण्यात आलेला 56 वर्षीय रुग्ण दिल्लीचा राहणारा आहे. हा रुग्ण 'ऑटोसोमल डोमिनन्ट पॉलिसिस्टीक किडनी' डिजीज नावाच्या जेनेटिक डिसऑर्डरने पीडित होता. हा एक आनुवांशिक आजार आहे. या आजारामध्ये दोन्ही किडनींमध्ये द्रव्याने भरलेले सिस्ट विकसित होतात. त्यामुळे आतून सूज येते. या रुग्णावर 2006 पासून उपचार सुरू होते. परंतु, रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तयार नव्हता, असं डॉ. सचिन कथूरिया यांनी सांगितलं.
यापूर्वीही जगभरात अशा स्वरुपाच्या किडनीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अमेरिकेतील एका रुग्णाच्या शरीरातून तब्बल 9 किलोची किडनी काढण्यात आली होती. तसेच नेदरलँडमध्ये एका रूग्णाच्या शरीरातून तब्बल 8.7 किलो वजनाची किडनी काढण्यात आली होती. किडनीच्या आजारांपासून वाचण्यासाठी वेळीच काळजी घेण गरजेचं आहे.