चीनमध्ये खरेच पोलिसांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांना ठार मारले? जाणून घ्या या Viral Video मागील सत्य

या साथीच्या आजाराने बाधित झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ चीनमध्ये एका दिवसात 242 लोकांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला आहे

कोरोना व्हायरस संबंधी खोटा व्हिडीओ (Photo Credits: Video Grab)

प्राणघातक कोरोना व्हायरस (Coronavirus)मुळे चीन (China) मध्ये 1300 हून अधिक लोक मरण पावले आहेत. या साथीच्या आजाराने बाधित झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ चीनमध्ये एका दिवसात 242 लोकांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला आहे. चीनमधील हुवेई प्रांतात या प्राणघातक विषाणूची सुमारे 15,000 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दुर्दैवाने, कोरोनाशी संबंधित बरीच खोटी किंवा फेक (Fake) माहिती सोशल मीडियावर पसरली आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, चिनी पोलिस कोरोना व्हायरस संक्रमित रूग्णांची हत्या करत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चिनी सरकारने संक्रमित रूग्णांच्या सामूहिक हत्येसाठी, कोर्टाची मंजूरी मागितली असा दावा करणारा अहवाल काही दिवसांपूर्वी समोर आला होता. भारतातील बर्‍याच लोकांनीही हे सत्य मानले आहे. मात्र, हा अहवाल पूर्णपणे खोटा होता.

( हेही वाचा: Coronavirus Outbreak: जगभरात कोरोना वायरसने बळी घेतलेल्यांंची संंख्या 1300 पेक्षा अधिक)

आता व्हायरल होत असलेल्या या नव्या बनावट व्हिडिओमध्ये, काही लोक मुखवटा घालून रस्त्यावर गोळीबार करतान दिसत आहेत. यामध्ये असा दावा केला जात आहे की, हे लोक चीनी पोलीस अधिकारी आहेत. या व्हिडीओमध्ये पदपथावरील मृत व्यक्ती दिसत असून, रडण्याचाही आवाज ऐकू येत आहे. मात्र तज्ञांनी याला बनावट व्हिडिओ म्हटले आहे. हा व्हिडिओ चुकीच्या बातम्या पसरविण्यासाठी संपादित केला गेला आहे. म्हणजेच इतर काही व्हिडिओ एकत्र जोडून या नवीन व्हिडीओ तयार केला गेला आहे.

पहा व्हिडीओ -

ऑब्झर्व्हर्स फ्रान्सने (Observers France) प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, या व्हिडिओमध्ये जो पिवळ्या रंगाच्या जॅकेटमधील माणूस रस्त्यावर रक्ताने माखलेला दिसत आहे, तो प्रत्यक्षात एका अपघाताचा आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर काँक्रीट पायऱ्यांचा तुकडा आणि मोटारसायकल रस्त्यावर कोसळताना दिसत आहे. व्हिडिओच्या दुसर्‍या भागामध्ये दिसणारे लोक हे चिनी पोलिसांचे अधिकारी नाहीत. या ठिकाणीही आपण बारकाईने पाहिले, तर आपल्याला समजेल की हा व्हिडिओ अचानकपणे मध्येच कापला गेला आहे आणि इतर व्हिडिओ क्लिपमध्ये जोडला गेला आहे. अशाप्रकारे हा व्हिडीओ पूर्णतः खोटा आहे.