Video: भाजप आमदार प्रविण दरेकर मैदानावर शॉट मारायला गेले अन भूईसपाट झाले

त्यांचा पाय घसरला आणि ते थेट जमीनीवरच पडले. ही घटना काही क्षणातच घडली. त्यामुळे जमीनवर पडताना ना दरेकर स्वत:ला सावरु शकले ना उपस्थितांना त्यांची मदत करता आली.

भाजप आमदार क्रिकेट खेळताना पाय घसरुन जमिनीवर आदळले | (छायाचित्र सौजन्य: युट्यूब)

BJP MLA Pravin Darekar Playing Cricket: आपणास एखाद्या कार्यक्रमाला बोलावले तर, प्रत्येक वेळी आपल्यात असल्या नसल्या गुणांचे प्रदर्शन करायलाच हवे असे नाही. पण, राजकीय नेत्यांना हे कोण सांगणार? आपण लोकांमधले वाटावे, उपस्थितांच्या टाळ्या मिळाव्या यासाठी मग ही नेतेमंडळी नको त्या फंदात पडतात आणि आपली फजीती करुन घेतात. भाजप आमदार (BJP MLA) प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांचीही अशीच फजिती झाल्याचे पाहायला मिळाले. कांदिवली येथे सीएम चषक स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आमदार दरेकर उपस्थित होते. दरेकरांनी उद्घाटन तर केले पण प्रत्यक्ष मैदानावर भलतेच घडले. जे घडले ते उपस्थितांच्या कॅमेऱ्यांनीही लागलीच कैद केले. आता हा केविलवाणा प्रसंग सोशल मीडियातून भलातच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते आहे.

आमदार दरेकरांनी सीएम चषक स्पर्धेचे उद्घाटन केले. आणि सध्या अनेक राजकीय नेत्यांमध्ये असलेल्या क्रेझप्रमाणे तेही मैदानावर उतरले. बहुदा आपणही उत्कृष्ठ क्रिकेट खेळू शकतो असे त्यांना वाटत असावे. ते काहीही असो पण दरेकर मैदानात उतरले. त्यांनी फलंदाजीसाठी बॅट हातात घेतली. आजूबाजूला क्रीडाप्रेमी आणि आमदार दरेकरप्रेमींची गर्दी होतीच. गोलंदाजाने चेंडू फेकला. आता आमदार दरेकर एक उत्तूंग फटका मारण्यासाठी तयार झाले. त्यांनी एखाद्या कसलेल्या क्रिकेटपटूप्रमाणे पोझ घेतली. उपस्थितांनी श्वास रोखून धरला. बहुतेकांना वाटले आता साहेब एक जबरदस्त शॉट मारणार. पण, घडले भलतेच. नको तिथे खेळी करुन दाखवण्याची घाई दरेकरांच्या अंगाशी आली. शॉट मारताना दरेकरांना तोल सांभाळता आला नाही. त्यांचा पाय घसरला आणि ते थेट जमीनीवरच पडले. ही घटना काही क्षणातच घडली. त्यामुळे जमीनवर पडताना ना दरेकर स्वत:ला सावरु शकले ना उपस्थितांना त्यांची मदत करता आली. दरेकर जमीनवर पडल्यानंतर मग उपस्थितांनी त्यांना हात दिला आणि उभे केले. (हेही वाचा, Video: शरद पवारांच्या बॉलिंगवर पृथ्वीराज चव्हाण यांची दमछाक; फटकावला नाही एकही चेंडू)

आमदार दरेकरांचा क्रिकेट खेळतानाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यावर सोशल मीडियावर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा एक अपघात आहे. तसेच, या घटनेबाबत उगाच चर्चा करत बसू नये. खेळताना पडझड ही होणारच. असे म्हटले आहे तर, राजकीय नेते नको तेथे उगाच उत्साह दाखवतात. मग, अनेकदा त्यांच्यासोबत अप्रिय घटना घडतात आणि त्यांची फजीती होते असे म्हटले आहे.