Mumbai: हार्बर रेल्वे मार्गावरील धावत्या लोकलमध्ये तरुणाला 5 जणांकडून बेदम मारहाण; रोख रक्कमेसह ATM कार्ड लुटले
पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Mumbai: हार्बर रेल्वे मार्गावरील (Harbor Railway Line) धावत्या लोकलमध्ये तरुणाला 5 जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. हा तरूण सीएसएमटी ते पनवेल लोकलमधून प्रवास करत होता. या पाच आरोपींनी तरुणाला धमकावून त्याच्याकडील रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि इतर वस्तू लुटल्या. त्यानंतर पीडित तरुणाने यासंदर्भात पनवेल रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद आरिफ शेख, असं या पीडित तरुणाचं नाव आहे. मोहम्मद हा धारावी परिसरात राहत असून तो नवी मुंबईत राहणाऱ्या आपल्या मित्राला मोबाईल फोन देण्यासाठी सोमवारी पहाटे लोकलने प्रवास करत होता. मोहम्मदने पनवेल पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मदने सोमवारी पहाटे जीटीबी रेल्वे स्थानकातून पनवेल लोकल पकडली होती. ही लोकल कुर्ला रेल्वे स्थानकात आल्यानंतर मोहम्मद बसलेल्या मालडब्यात पाच तरुण चढले. यातील एकाने मोहम्मदकडे पैसे मागितले. तसेच लोकल सीवूड्स रेल्वे स्थानकात आल्यानंतर या पाच जणांनी मोहम्मदला धमकावून त्याच्याकडे 500 रुपयांची मागणी केली. मोहम्मदने या पाच जणांना पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर या आरोपींनी मोहम्मदला मारहाण करण्यास सुरूवात केली आणि त्याच्याकडील पैसे, एटीएम कार्ड व इतर काही वस्तू हिसकावून घेतल्या. (हेही वाचा - Mumbai: औषध लावण्याच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग; वॉर्डबॉयला अटक)
दरम्यान, या सर्व प्रकारात मोहम्मद जखमी झाला. त्यानंतर पाचही आरोपींनी बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून पळ काढला. मोहम्मदने स्वत: ला सावरत बेलापूर रेल्वे स्थानकातील टीसीकडे धाव घेतली आणि त्यांना आपल्या सोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर टीसीने पनवेल रेल्वे पोलिसांना बोलावून पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. सध्या पनवेल पोलिस या पाच आरोपींचा शोध घेत आहेत.