चिंताजनक! मुंबईमधील डॉक्टरला तीन वेळा Covid-19 चा संसर्ग; लस घेतल्यानंतरही दोन वेळा Positive
त्यानंतर 2021 मध्ये, 29 मे रोजी दुसऱ्यांदा व 11 जुलै रोजी तिसऱ्यांदा त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला.
कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीची सुरुवात झाल्यापासून एकाच व्यक्तीला एका पेक्षा जास्त वेळा विषाणूचा संसर्ग झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र लसीकरणानंतरही (Vaccination) संसर्ग झाल्याच्या फार कमी घटना आहेत. आता मुंबईमध्ये (Mumbai), जून 2020 पासून मुलुंडमधील एक 26 वर्षीय डॉक्टरला तीन वेळा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावर्षी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही त्या दोनदा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तीनवेळा कोरोना पॉझिटिव्ह डॉ. श्रुती हलारी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की वारंवार सकारात्मक चाचणी येणे हे गोंधळात टाकणारे आहे.
आता एखाद्या व्यक्तीमध्ये लसीकरणानंतरच्या संसर्गावरील अभ्यासाचा भाग म्हणून जीनोम सिक्वेंसींगसाठी त्यांचे स्वाब नमुने गोळा केले गेले आहेत. डॉ. श्रुती हलारी यांना तीन वेळा कोविड-19 ची लागण कशी झाली याबद्दल कोणतेही स्पष्ट उत्तर नाही. डॉक्टरांच्या पथकाने स्पष्ट केले की यासाठी SARS2 व्हेरिएंटपासून ते त्यांची प्रतिकारशक्ती अशी अनेक कारणे असू शकतात. यामध्ये चुकीचे निदान हेदेखील एक कारण असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. कोविड-19 चाचणीसाठी RT-PCR सर्वोत्तम मानक असले तरी ते सुमारे 70 ते 75 टक्के अचूक व वैध आहे.
जगभरातील डॉक्टरांमध्ये पुनःपुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे, काही अभ्यास मुंबईतील रुग्णालयांतूनही झाले आहेत. मात्र, जोपर्यंत जनेटिक सिक्वेंसींगच्या मदतीने दोन किंवा अधिक स्वाब नमुन्यांची तुलना होत नाही, तोपर्यंत काही ठोस सिद्ध होऊ शकणार नाही.
सोमवारी, पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लसीकरणानंतरही डॉ. श्रुती हलारी यांना कोरोनाचा नक्की कसा संसर्ग झाला याची तपासणी करण्यासाठी त्यांचे नवीन नमुने घेण्यात आले. त्यातील एकावर बीएमसी आणि दुसऱ्यावर खासगी हॉस्पिटल फाऊंडेशन फॉर मेडिकल रिसर्च (एफएमआर) संसर्गाची कारणे शोधण्यासाठी अभ्यास चालू आहे. (हेही वाचा: पुढच्या महिन्यात येऊ शकते लहान मुलांसाठीची Covid-19 Vaccine; आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांची माहिती)
दरम्यान, मुलुंड येथील बीएमसीच्या कोविड-19 सेंटरमध्ये काम करत असताना हलारी 17 जून 2020 रोजी पहिल्यांदाच पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यानंतर 2021 मध्ये, 29 मे रोजी दुसऱ्यांदा व 11 जुलै रोजी तिसऱ्यांदा त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. तीनही वेळा आपल्यामध्ये लक्षणे दिसून आल्याचे त्या म्हणतात.