Worli Hit-and-Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणात शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांना अटक
राजेश शहा आरोपी मिहीर शहा यांचे वडील आहेत.
वरळी हिट अँड रन प्रकरणी वरळी पोलिसांनी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिडावत यांना अटक करण्यात आलीय. राजेश शहा आरोपी मिहीर शहा यांचे वडील आहेत. दरम्यान मिहीर हा अपघातप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो अद्याप फरार आहे. या प्रकरणात कार चालक राजेंद्रसिंह बिडावतसह राजेश शहा यांना अटक करण्यात आलीय. राजेंद्रसिंह हा अपघातावेळी कारमध्ये होता. दरम्यान वरळी पोलिसांनी या दोघांची दिवसभर चौकशी केली, त्यानंतर यांना अटक करण्यात आलीय. आरोपी मिहीर शहाला पळून जाण्यासाठी या दोघांनी मदत केल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. तसेच या अपघात प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा संशय पोलिसांना असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. (हेही वाचा - Worli Hit-and-Run Case: वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील जप्त करण्यात आलेल्या BMW Car ची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम वरळी पोलीस ठाण्यात दाखल, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (Watch Video))
पाहा व्हिडिओ -
दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिले जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल. मग तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे."
मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली होती.