हिंगोली: तंबाखूची थुंकी अंगावर पडल्याने डोक्यात फावडा घालून तरुणाची हत्या
समाजात तंबाखू, गुटखा खाणाऱ्या व्यक्तिंचे प्रमाण मोठे आहे. हे लोक तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी कुठेही थुंकत असतात. मात्र, या थुंकीमुळेच तंबाखू खाणाऱ्या एका व्यक्तिला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
अंगावर तंबाखूची थुंकी (Tobacco Spit) पडल्याने दोन मजुरांमध्ये झालेला किरकोळ वाद एकाच्या जीवार बेतला. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात शेवाळा येथे ही घटना घडली. ज्ञानेश्वर कुंभकर्ण असे आरोपीचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तर, सय्यद अफसर सय्यद रसूल असे या घटनेत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपी आणि मृत इसम हे दोघेही कामगार आहेत. शेवाळा येथील बसवेश्वर चौकात पेव्हर ब्लॉक बसवत असताना ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, सय्यद अफसर सय्यद रसूल आणि ज्ञानेश्वर कुंभकर्ण हे दोघे एकत्र काम करत होते. सय्यद याला तंबाखू खाण्याची सवय होती. पेव्हर ब्लॉक बसवत असताना सय्यद याने तंबाखू खाल्ली होती. दरम्यान, सय्यद याने तंबाखूची थुंकी थुंकली. ती ज्ञानेश्वर कुंभर्ण याच्या अंगावर उडाली. या प्रकाराचा कुंभकर्ण याला प्रचंड राग आला. रागाच्या बरात त्याने सय्यदशी भांडण काढत त्याच्या डोक्यात फावडा मारला. घाव वर्मी लागल्याने सय्यद जागीच कोसळला. हा प्रकार उपस्थितांच्या नजरेस येताच त्यांनी सय्यद याला आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, पुढील उपचारासाठी त्याला नांदेडला हालविण्यात आले. दरम्यान, सय्यद याचा मृत्यू झाला. (हेही वाचा, मॉडेलच्या प्रेमात आंधळे झालेल्या पतीने केली पत्नीची हत्या)
या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इतक्या क्षुल्लक कारणामुळे एका व्यक्तिला प्राण गमवावे लागणे ही घटनाच परिसरातील नागरिकांना आश्चर्यचकित करत आहे. समाजात तंबाखू, गुटखा खाणाऱ्या व्यक्तिंचे प्रमाण मोठे आहे. हे लोक तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी कुठेही थुंकत असतात. मात्र, या थुंकीमुळेच तंबाखू खाणाऱ्या एका व्यक्तिला आपले प्राण गमवावे लागले आहेत.