संतापजनक! पिंपरी-चिंचवड येथे धावत्या टेम्पोमध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार; लिफ्ट देण्याचा बहाण्याने केली फसवणूक

याबाबत महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर चालक आणि क्लिनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रतिकात्मक फोटो (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या कोरोना व्हायरसमुळे पुणे (Pune) सतत चर्चेत आहे. महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला आहे. आता बलात्काराच्या (Rape) एका संतापजनक घटनेमुळे पुण्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुण्यातील पिंपरी (Pimpari) येथे चालत्या गाडीत 29 वर्षीय महिलेवर दोघांनी सामुहिक बलात्कार केला आहे. याबाबत महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर चालक आणि क्लिनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे दोघेही फरार आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथून ही महिला निघाली होती, तिला पेरणे फाटा येथे जायचे होते. एका टेम्पो चालकाने तिला इच्छित स्थळी सोडतो असे सांगून गाडीमध्ये घेतले. त्यानंतर तिला पिंपरी येथे आणून टेम्पो चालकाने बलात्कार केला व क्लिनरने बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. 10 मार्चला रात्री अकरा ते 11 मार्च रोजी पहाटे 4 या दरम्यान हा प्रकार घडला. यावेळी या दोघांनी महिलेला मारहाण करत शिवीगाळही केला. (हेही वाचा: पिंपरी: तरुणीला गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार, पोलिसात गुन्हा दाखल)

पहाटे त्यांनी तिला पिंपरी येथे सोडल्यावर ही महिला पुन्हा आळंदी येथे गेली. घडल्या प्रकाराबाबत तिने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार चालक आणि क्लिनर विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. सध्या हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान पिंपरी चिंचवड परिसरात 11 महिन्यांत तब्बल 134 महिलांवर बलात्कार झाला असून, 377 महिलांचा विनयभंग करण्यात आला आहे.