ठाणे: मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकाजवळ लोकलमधून महिला पडली; मोटरमनच्या तत्परतेमुळे वाचले प्राण
गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान एक महिला धावत्या लोकलमधून पडली
धावत्या ट्रेनमधून पडलेल्या एका महिलेला वाचवण्यात मोटरमननंला यश आलं आहे. गुरुवारी (1 ऑगस्ट) सकाळी साडेनऊच्या सुमारास मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान एक महिला धावत्या लोकलमधून पडली. मात्र प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे आणि मोटरमननंच्या तत्परतेमुळे या महिलेला वाचवण्यात यश आले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कल्याणकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सेमी फास्ट लोकलच्या महिला डब्यातून एक महिला मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान खाली पडली. गर्दीमुळे हा प्रसंग ओढावला असला तरी डब्यातील महिला प्रवाशांनी अत्यावश्यक सेवेची साखळी खेचून लोकलच्या मोटरमनला संकेत दिले. त्यानंतर मोटरमन ए.ए.खान यांनी तातडीने लोकल थांबवली आणि घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे सुरक्षारक्षक सुधीर मोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खान यांनी स्वतः उचलून लोकलमधून पडून जखमी झालेल्या महिलेला कळवा स्थानकावर पोहचवलं, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर वेगवेगळ्या अपघातात एकाच दिवशी 16 ठार, एकदिवसीय दुर्घटनेतील मृत्यूंची उच्चांकी नोंद)
त्यानंतर महिलेच्या नातेवाईंकांना कळवून तिच्यावर प्रथोमोपचार करण्यात आले. महिलेला झालेली दुखापत फारशी गंभीर नसल्याने महिलेने आपल्या नातेवाईकांसह पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. (भारतीय रेल्वे ट्रॅकमॅनच्या सोबतीला GPS यंत्रणा, अपघात 70% आटोक्यात ठेवण्यात रेल्वेला यश देतोय 'हा' प्रयोग)
मुंबईची लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. आपला दैनंदिन कारभार तिच्यावर अवलंबून आहे. मात्र मुंबईत सातत्याने वाढणाऱ्या गर्दीमुळे रेल्वेप्रवास अधिकाधिक कठीण आणि धोकादायक होत आहे. मात्र अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणे आणि इतरांना शक्यतो आपल्यामुळे त्रास होणार नाही याची दक्षता घेणे, तसंच वेळप्रसंगी मदत करणे यामुळेच आपण आपला आणि इतरांचा प्रवास सुखकर करु शकतो. तसंच रेल्वेत वारंवार होणाऱ्या दुर्घटनांकडे रेल्वे प्रशासनानेही गंभीरपणे लक्ष देत योग्य ते पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.