कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी? महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील महत्त्वाचा निकष
हा लाभ घेताना शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. विशेष म्हणजे या कर्जमाफीसाठी कोणतीही अट ठेवली नाही.
Mahatma Jyotirao Phule Farmer Loan Waiver Scheme Important Criteria: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या महाविकासआघाडी सरकारने पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना (Mahatma Jyotirao Phule Farmer Loan Waiver Scheme) राज्यसरकारने जाहीर केली. या योजनेसाठी राज्यातील सर्व शेतकरी पात्र असले तरी, या योजनेचे प्रसारमाध्यमांतून जाहीर झालेले निकष (Loan Waiver Scheme Important Criteria) पाहता काही शेतकऱ्यांना मात्र शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही. असे कोणते शेतकरी असतील ज्यांना घेता येणार नाही राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ? घ्या जाणून
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत राज्यातील सर्व छोटे-मोठे शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी ठरणार आहेत. हा लाभ घेताना शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. विशेष म्हणजे या कर्जमाफीसाठी कोणतीही अट ठेवली नाही. त्यामुळे कर्जमाफीची थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. प्रमुख्याने ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जोडण्यात आला आहे त्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा होणार आहे.
कोणास मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ?
दरम्यान, राज्यातील सर्व छोटे-मोठे शेतकरी जरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र असले तरी, राज्य सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री तसेच, विधिमंडळ सदस्य असलेले आमदार आणि सरकारी कर्मचारी मात्र या कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असणार नाहीत. राज्य सरकारनेच कर्जमाफी निकषामध्ये हा मुद्दा मांडला असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. म्हणजेच मंत्री, आमदार आणि सरकारी सेवेत असणारे कर्मचारी वगळता इतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. (हेही वाचा, Kisan Diwas 2019: महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना निकष,अटी, पात्रता यांबाबत जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी)
दरम्यान, राज्य सरकारने केलेली कर्जमाफी विरोधी पक्षांना मात्र फारशी आवडलेली दिसत नाही. त्यामुळेच विरोधी पक्षात असलेल्या भाजपने महाविकासआघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेवर तीव्र टीका केली आहे. विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करताना ही कर्जमाफी अत्यंत फसवी आहे. विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.