Coronavirus: आता कोरोनाग्रस्त रुग्णांच्या हातावर मारला जाणार निळ्या शाईचा शिक्का; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत संपूर्ण जगात 6 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरस आता भारतातही दाखल झाला असून महाराष्ट्रात आतापर्यंत 39 रुग्ण सापडले आहेत.

Maharashtra Health Minister Rajesh Tope (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत संपूर्ण जगात 6 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरस आता भारतातही दाखल झाला असून महाराष्ट्रात आतापर्यंत 39 रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील लोक अधिक घाबरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून (State Government) युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आता कोरोना बाधित रुग्णाच्या हातावर निळ्या शाईचा शिक्का मारला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जाहीर केले आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णात वाढ होऊ नये, यासाठी राज्यातील व्यायाम शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. याशिवाय आवश्यकता नसल्यास शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी प्रसार माध्यमातून केले आहे.

नुकतीच राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. राजेश टोपे म्हणाले की, कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या देशांमधून आलेल्या लोकांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. यापुढे कोरोनाग्रस्त रुग्णांचे अ, ब, क असे गट तयार केले जाणार आहे. ज्या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणे आहेत, आशा लोकांना 'अ' गटात ठेवले जाणार आणि जे वयोवृद्ध आहेत. तसेच त्यांच्यात डायबिटीज, हायपर टेन्शन आहे, अशा लोकांना 'ब' कक्षात ठेवले जाणार आहे. तर, 'क' गटामध्ये लक्षण नाही त्यांना घरी क्वॉरेंटाईन करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, घरी क्वॉरेंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर निवडणुकीच्या शाईप्रमाणे शिक्का मारला जाणार आहे. यामुळे घरी क्वॉरेंटाईन केलेले लोक जर घराबाहेर दिसले तर, बाहेरील लोकांना समजेल की, अशा व्यक्तींना घरी क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- कोरोना विषाणूबाबत बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल; BCOM परीक्षेबाबत कोर्टाने मुंबई विद्यापीठाला बजावली नोटीस

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, मॉल्स, सिनेमागृहे, बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर मशिदी, चर्चसह धार्मिक स्थळेही काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्यात सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका निवडणूका आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दोनही निवडणुका पुढील 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. हा महत्वपूर्ण निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घेण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्या याबाबत अशा सूचना विद्यापीठ मंडळाला देण्यात आल्या आहेत.