Nana Patole: 'आम्ही मागे हटणार नाहीत' काँग्रेस नेते नाना पटोले यांचा अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांना इशारा

आज पेट्रोल दर 100 रुपये लिटर तर, घरगुती गॅस सिलेंडर 800 रुपये एवढा महाग झाला असून सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे.

Nana Patole (Photo Credits-ANI)

मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅस दरांमध्ये प्रचंड मोठी वाढ केली आहे. आज पेट्रोल दर 100 रुपये लिटर तर, घरगुती गॅस सिलेंडर 800 रुपये एवढा महाग झाला असून सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्रात काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना विविध मुद्द्यावरून सरकारविरोधात आवाज उठवणारे आज गप्प का? असा सवाल करत महाराष्ट्राचे काँग्रेसचे काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपाच्या इशाऱ्यावर टिव टिव करणाऱ्या अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यांचे चित्रपटांचे शूटींग व चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

नुकतीच एएनआय वृत्त संस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत नाना पटोले म्हणाले की, मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध नव्हे तर, त्यांच्या कार्याविरुद्ध बोललो आहे. हे खरे नायक नाहीत. जर असते तर, संकट काळात ते जनतेच्या पाठिशी उभे राहिले असते. परंतु, त्यांना कागज के शेर राहायचे असेल तर, आम्हाला काही अडचण नाही, असे नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच आम्ही मागे हटणार नाहीत. जेव्हा यांचे चित्रपट प्रदर्शित होतील किंवा ते आम्हाला दिसतील, तेव्हा लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवत आम्ही त्यांचा निषेध करणार. आम्ही गोडसे वाले नसून गांधी वाले आहोत, असेही नाना पटोले म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Janata Darbar: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 'जनता दरबार' उपक्रम पुढील दोन आठवड्यांकरिता स्थगित- अनिल देशमुख

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, युपीएचे सरकार हे लोकशाही आणि संविधानावर चालणार होते. मात्र, त्यावेळी अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह असंख्य सेलिब्रिटी सरकार विरोधात आवाज उठवत होते. आज या मंडळींनी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे अपेक्षित असताना ते भाजपाच्या हातचे बाहुले बनले आहेत. शेतकरी आंदोलन व इंधन दरवाढीविरोधात आता कोणच बोलत नाही. यामुळे काँग्रेसने या भाजपाच्या पोपटांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, असे पटोले म्हणाले होते.