माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला शोक

वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

Governor Bhagat Singh Koshyari, Vishnu Savra & Devendra Fadnavis (Photo Credits: FB)

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा (Vishnu Savara) यांचं आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. तसंच त्यांनी विष्णू सावरा यांच्या भरीव कार्याचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Vishnu Savara Passed Away: महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं निधन)

देवेंद्र फडणवीस:

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, "भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विष्णू सावरा यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील." पुढे ते म्हणाले की, "भारतीय जनता पार्टीत जिल्हाध्यक्ष, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश सचिव अशा विविध भूमिकांमधून संघटनात्मक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. निवासी शाळांचे व्यवस्थापन, आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार यासाठीही त्यांनी अनेक परिश्रम घेतले. स्पष्टवक्तेपणा आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आदिवासी कल्याणाच्या अनेक योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे 30 वर्ष त्यांनी विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी:

विष्णू सावरा यांच्या निधनानंतर व्यक्त होताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "विष्णु सावरा यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मितभाषी, संवेदनशील व कर्तव्यदक्ष व्यक्तित्व असलेले सावरा जनसेवेसाठी सदैव तत्पर असत. उत्तम संघटक असलेले सवरा विधानमंडळाचे अनुभवी सदस्य होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले होते. त्यांच्या निधनामुळे आदिवासींच्या विकासासाठी आत्यंतिक तळमळ असणार्‍या जीवनाचा अस्त झाला आहे. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवतो."

1980 मध्ये भारतीय जनता पक्षात विष्णू सावरा यांनी पर्दापण केले. त्यानंतर 1980 आणि 1985 च्या विधानसभा निवडणुकीत वाडा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र दोन्ही निवडणूकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र 1990 साली वाडा मतदार संघातून ते विजयी झाले आणि 2014 पर्यंत सर्व निवडणुकांमध्ये विजयाची परंपरा कायम राखली.