Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषद निवडणूक, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कडून उमेदवार जाहीर; नाराजांच्या संख्येत वाढ

विधानपरिषद निवडणूक 2025 साठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Election | (Representational Image)

महाराष्ट्र विधानपरिषद (Vidhan Parishad 2025) रिक्त जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. तिन्ही पक्षांनी उमेदवार तर जाहीर केले. विधानसभेतील संख्याबळामुळे ते उमेदवार निवडुणही येतील. पण, या उमेदवारीमुळे दोन्ही भाजप नेतृत्व आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. कारण, सत्तावाटपात भाजपला तीन आणि इतर दोन पक्षांना प्रत्येकी एक जागा वाट्याला आली असताना इच्छुकांची बहुगर्दी होती. त्यामुळे संधी मिळालेले तिघेच असून इतरांची संधी नाकारली गेल्याने पक्षनेतृत्वासमोर मोठी नाराजी व्यक्त झाल्याचे समजते.

जागावाटपाचे गणित

विधानपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळ विचारात घेता भारतीय जतना पक्षाचे आमदार अधिक आहेत. त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मग अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस. सहाजिकच सत्तेचा वाटा भाजपला अधिक मिळाला आहे. त्यामुळे विधापरिषदेतील रिक्त होत असलेल्या एकूण पाच जागांसाठी भाजपच्या वाट्याला तिन आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली. त्यानुसार प्रत्येक पक्षाने आपाले उमेदवार जाहीर केले आहेत. (हेही वाचा, Maharashtra Legislature Committees: राज्य विधिमंडळ समित्या जाहीर, भाजपच्या वाट्याला 11 अध्यक्षपदे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिक्षेत)

भाजप: माधव भंडारी यांचा पत्ता पुन्हा कट

भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेसाठी आपल्या तिन नावांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, पक्षामध्ये पाठिमागील अनेक वर्षांपासून चर्चा असलेल्या माधव भंडारी यांचा पत्ता मात्र पुन्हा एकदा कापला गेला आहे. माधव भंडारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये पाठिमागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. प्रत्येक वेळी ते विधानपरिषदेसाठी भाजपकडून दावेदार असतात. पण, भाजप त्यांना उमेदवारी देत नाही. प्रदीर्घ काळ ते भाजपचे प्रवक्ते देखील राहिले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याची नेहमीच चर्चा असते. ती या वेळीही रंगली आहे. (हेही वाचा, रविंद्र धंगेकर यांची शिवसेना पक्षामध्ये घरवापसी; कॉंग्रेसला रामराम)

राष्ट्रवादी काँग्रेस: झिशान सिद्दीकी यांचा पत्ता कट

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधापरिषदेवर झिशान सिद्दीकी यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित होते. पण, ऐनवेळी सूत्रे फिरली आणि संजय खोडके यांच्या नावार शिक्कामोर्तब झाले. संजय हे आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत. त्यांचे नाव पक्षाने जाहीर केल्यामुळे झिशान सिद्दीकी यांचे नाव मागे पडले. झिशान सिद्दीकी हे अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आहेत. पक्षाने त्यांना विधानसभा निवडणूक 2024 मध्ये संधी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यामुळे विधानपरिषद देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाण्याची चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडले नाही.

शिवसेना: शितल म्हात्रे, किरण पांडव, संजय मोरे यांना धक्का

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने नंदुरबारचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या जागेसाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर सातत्याने टीका करणाऱ्या शितल म्हात्रे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, हळूहळू ते खूपच मागे पडत गेले. शिवाय, शिवसेना सचिव आणि ठाण्याचे माजी महापौर असलेल्या संजय मोरे यांचेही नाव चर्चेत होते. एकनाथ शिंदे यांचे अतिशय निकटवर्तीय असलेल्या मोरे यांना संधी मिळेल असे मानले जात होते. मात्र, त्याचेही नाव मागे पडले. त्यासोबतच नागपूरचे किरण पाडव हे नाव देखील काही काळ चर्चे आले आणि लुप्त झाले.त्यामुळे या सर्वांन मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, विधानपरिषदेसाठी येत्या 27 मार्च रोजी मतदान पार पडत आहे. त्यासाठी आज (सोमवार, 17 मार्च) दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे वेळेचे औचित्य साधत राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement