Vidhan Parishad Election 2022: विधानपरिषद निवडणुकीमध्ये BJP ला पाचही जागांवर यश; महाविकास आघाडीला मोठा धक्का, जाणून घ्या विजयी उमेदवारांची यादी

अशाप्रकारे विधान परिषदेच्या 10 जागांसाठी भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 2, काँग्रेसचे 2 आणि शिवसेनेचे 2 असे एकूण 11 उमेदवार निवडणूक लढत होते.

Maharashtra Vidhan Parishad Election | (Photo Credit: Archived, edited, representative images)

गेले अनेक दिवस संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार जिंकले असून, भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. याशिवाय राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे भाजपकडून महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. कॉंग्रेसचे भाई जगताप विजयी ठरले असून, चंद्रकांत हंडोरे यांचा परभाव झाला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले होते, तर भाजपने पाच उमेदवारांना तिकीट दिले होते. अशाप्रकारे विधान परिषदेच्या 10 जागांसाठी भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 2, काँग्रेसचे 2 आणि शिवसेनेचे 2 असे एकूण 11 उमेदवार निवडणूक लढत होते. विधान परिषदेच्या नऊ सदस्यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे. त्याचवेळी या वर्षाच्या सुरुवातीला भाजपच्या एका सदस्याचा मृत्यू झाल्याने दहाव्या जागेवर निवडणूक झाली. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. (हेही वाचा: नाना पटोलेंचे गंभीर आरोप, केंद्रीय तपास यंत्रणांकडून मविआच्या आमदारांना फोन)

विजयी उमेदवार -

रामराजे निंबाळकर- 28

एकनाथ खडसे- 29

आमश्या पाडवी- 26

सचिन अहिर- 26

प्रवीण दरेकर- 29

राम शिंदे-30

श्रीकांत भारतीय- 30

उमा खापरे- 27

प्रसाद लाड- 28

भाई जगताप- 26

महत्वाचे म्हणजे विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांना 134 मते मिळाली आहेत. सध्या विधानसभेत भाजपचे 106 आमदार आहेत, तर मित्रपक्षांच्या पाठिंब्यानंतर हा आकडा 113 वर पोहोचला आहे. मात्र आताच्या निकालानुसार महाविकास आघाडीची 21 मते फुटली आहेत. ही मते नेमकी कुणाची. तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची 52 मते पडली, मग शिवसेनेची हक्काची 3 मते कुणाला गेली? अशी चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मते फुटली असून त्यांना पहिल्या पसंतीची केवळ 41 मते मिळाली आहे.

महाराष्ट्रातील आमदारांचे संख्याबळ एकूण 285 आहे. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला किमान 26 मतांच्या कोट्याची गरज होती. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने देखील कॉंग्रेस आपला एक उमेदवार विजयी करू शकली नाही, यावरून महाविकास आघाडी सरकारवर असलेली आमदारांची नाराजी, असंतोष दिसत असल्याची टीका भाजपने केली आहे.