Teacher and Graduate Constituency Election 2020: महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल; गोपनीयेतचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झाले आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी (Teacher and Graduate Constituency Election 2020) आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान झाले. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झाले आहे. 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांचा मतदान करतानाचा व्हिडिओ फेसबूक व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद विभागातील पदवीधर निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. सर्वच दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदानांचा हक्क बजावला आहे. मात्र, उस्मानाबादेत मतदान करते वेळी मतदारकडून गोपनीयतेचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा मतदान करतानाचा व्हिडिओ काढून विजय कुरुंद नावाच्या एका व्यक्तीने तो फेसबुकवर पोस्ट केला होता. यामुळे गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी कळंब इथल्या विजय कुरुंद याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कलम 188 , 128 , 130 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ फेसबुकवरून काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती टीव्ही9ने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra MLC Election 2020: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात
पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 4 लाख 26 हजार 257 मतदारांनी नोंदणी केली होती. चार वाजेपर्यंत पुणे पदवीधरमध्ये 49.52 टक्के मतदान झाले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात दुपारपर्यंत 8 जिल्ह्यांमध्ये दुपारी 3 पर्यंत 43 टक्के मतदानाची नोंद झाली होती. नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान झाले आहे.