Vedanta-Foxconn: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन रणकंदण, CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा पाऊस
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-गट आणि भाजप यांचे सरकार आले. रा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना महाराष्ट्रात येऊ पाहात असलेला 'वेदांता' ग्रुप व तैवॉन येथील 'फॉक्सकॉन' (Vedanta Foxconn) प्रकल्प पाहाता पाहता गुजरातला गेला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-गट आणि भाजप यांचे सरकार आले. राज्यातील सत्तांतराच्या काळात घडलेली ही मोठी घटना आहे. ज्याचा राज्याच्या आर्थिक आरोग्य आणि उद्योगासोबतच रोजगार निर्मितीला मोठाच फटका बसला आहे. याच मुद्द्यावरुन राज्यात सध्या रणकंदण माजले असून, विरोधकांकडून आणि राज्याच्या हितचिंतकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तर राज्य सरकारकडून विरोधकांवरच आरोप केले जात आहेत. 'फॉक्सकॉन' प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी महाविकासआघाडीकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता गुजरातला गेला. त्यासाठी तत्कालीन नेतृत्व जबाबदार असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे.
नवीन गुंतवणुकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही- आदित्य ठाकरे
वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो. हा प्रोजेक्ट इतर राज्यात गेला त्याचे दुःख नाही, पण आपल्या राज्यात का आला नाही, याचे आश्चर्य आहे. ज्या प्रोजेक्टवर एवढं काम करून मविआ सरकारने एवढं पाठबळ देऊनही हा प्रोजेक्ट तिथे जाणे, याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणुकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, राज ठाकरे यांचा सवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं.
वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पात अचानक गुजरात कोठून आले?, सुभाष देसाई यांचा सवाल
वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा माहिती आणि तंत्रज्ञानावर आधारीत आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, तेलंगणा आणि हरियाणा या राज्यांमध्येच स्पर्धा होती. त्यातून वेदांताने महाराष्ट्राची निवड केली. असे असताना गुजरात मध्येच अचानकपणे आले कोठून असा सवाल सुभाष देसाई यांनी केला आहे. दरम्यान, वेदांताच्या अनिल अग्रवाल यांनीही वेदांता महाराष्ट्रात प्रकल्प उभारणार आहे. सर्व तयारी झाली आहे. आता केवळ केंद्र सरकारचा होकार घ्यायचा आहे, इतकेच बाकी आहे, असे सांगितले होते. तर मग मध्येच गुजरात कोठून आले असा सवाल सुभाष देसाई यांनी उपस्थित केला आहे.