Buldhana Bus Tragedy: वाशी आरटीओची विशेष मोहीम; बुलढाणा बस दुर्घटनेनंतर बेकायदेशीरपणे धावणाऱ्या बसेसची करणार तपासणी

समृद्धी महामार्गावर नुकत्याच झालेल्या अपघातानंतर, राज्य सरकारने रस्त्यावर धावणाऱ्या सर्व अनधिकृत आणि बेकायदेशीर वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Buldhana Bus Accident (PC - Twitter)

Buldhana Bus Tragedy: गेल्या दोन महिन्यांत वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुरेशा परवानग्या व कागदपत्रांशिवाय धावणाऱ्या बसेसवर धडक कारवाई केली आहे. आरटीओ (RTO) ने सुमारे 74 बसेसना दंड केला आणि 4.5 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.

समृद्धी महामार्गावर नुकत्याच झालेल्या अपघातानंतर, राज्य सरकारने रस्त्यावर धावणाऱ्या सर्व अनधिकृत आणि बेकायदेशीर वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांच्या आधारे वाशीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (Dy RTO) हेमांगिनी पाटील यांनी या भागातील अवैध बसेस आणि अनधिकृत वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. (हेही वाचा - Pune Traffic Police: वाहतूक पोलीसांकडून लवकरच नवी यंत्रना सज्ज, नियमांचे उल्लखन केल्यास नवीन तंत्रज्ञानाकडून कारवाई)

पुढील 10 ते 15 दिवस ही मोहीम सुरू राहण्याची अपेक्षा असल्याचे पाटील यांनी सांगितले. आरटीओ अधिकारी दंड आकारत आहेत आणि रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहेत, असं पाटील यांनी सांगितलं.

बसेससह अनेक वाहने वैध परवानग्या, फिटनेस प्रमाणपत्र, विमा आणि वैध प्रदूषण नियंत्रण सार्वजनिक सेवा वाहन (PUC) प्रमाणपत्रांशिवाय चालत असल्याचे आढळून आले. काही प्रकरणांमध्ये, प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या बसेसचा व्यावसायिक माल वाहतुकीसाठी गैरवापर झाला आहे.